पहिल्याच दिवशी बस हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:15+5:302021-06-09T04:44:15+5:30
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर होती. त्यामुळे राज्यशासनाने लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन होण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच एसटी महामंडळाची ...

पहिल्याच दिवशी बस हाऊसफुल्ल!
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर होती. त्यामुळे राज्यशासनाने लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन होण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच एसटी महामंडळाची ग्रामीण भागातील सेवा बंद केली होती. एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठीच होती. मात्र त्याला प्रतिसाद अतिशय अल्प मिळत होता. अनेक गाड्या गेल्या दोन महिन्यांपासून जागेवरच उभ्या होत्या. बससेवा बंद असल्याने, महामंडळाला कोट्यवधीचा फटका बसला.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला. अनलॉकमध्ये बस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी मिळाली.
धुळे जिल्ह्यातील पाचही आगारातून आज लांब पल्ल्याची बससेवा सुरू झाली. धुळे आगारातून सकाळी ६.३० वाजता पहिली बस सुटली. बससेवा सुरू झाल्याने, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पहिल्या दिवशी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. काही मार्गावरील बसगाड्यांमध्ये ५० पेक्षा अधिक प्रवासी असल्याचे दिसून आले. पावणेदोन महिन्यांनंतर बसस्थानकाचा परिसरही गजबजलेला दिसून आला. दोंडाईचा आगारातून ५९ फेऱ्या झाल्या. त्यातून दोंडाईचा आगाराला तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती दोंडाईचा आगारातून देण्यात आली.
नाशिक मार्गावर गर्दी
सोमवारपासून बससेवा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिक मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी दिसून आली. धुळे येथून बायपाससह पाचही आगारातून नाशिकसाठी बसेस सोडण्यात आलेल्या होत्या. या सर्व गाड्यांना गर्दी होती. त्यापाठोपाठ पुणे मार्गावरील गाड्यांना गर्दी होती.
वर्षभरापासून रेल्वे बंदच
धुळे येथून मुंबई-पुण्याला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा नाही. धुळे-चाळीसगाव पॅसेंजरला मुंबई-पुण्यासाठी दोन-दोन स्वतंत्र बोग्या लावण्यात येतात. मात्र गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धुळे-चाळीसगाव रेल्वे बंद झाली ती आजतागायत सुरू झालेली नाही. पॅसेंजरच नसल्याने, मुंबई-पुण्यासाठी बोग्या लावण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना एसटीशिवाय पर्याय नाही. प्रवाशांची गरज ओळखून एसटी
महामंडळातर्फेही बसेस सोडण्यात येतात. त्याला प्रतिसाद चांगला मिळतो.
दरम्यान जिल्ह्यात दोंडाईचा व शिंदखेडा या दोन ठिकाणीच रेल्वेस्थानके असून, या ठिकाणीही जलद गाड्या थांबण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेकजण बसनेच प्रवास करीत असतात.
दीर्घ कालावधीनंतर बससेवा सुरू झाल्याचा आनंद आहे. आता ई-पासशिवाय प्रवास करता येतो आहे. बस सुरू झाल्याने, नाशिकला जाणे सोयीचे झालेले आहे.
- गंभीरराव पवार,प्रवासी
बस नसल्याने, गेल्या दोन महिन्यांपासून प्रवास करता येत नव्हता. मात्र आता लालपरीची सेवा सुरू झाल्याने, नातेवाइकांच्या भेटीला जाणे शक्य होत आहे.
- कमलाबाई पाटील, प्रवासी
कोरोनामुळे बससेवा बंद होती. आता ती पूर्ववत सुरू झालेली असली तरी महामंडळाने कोरोनाच्या नियमाचे पालन करावे. बसमध्ये मर्यादित प्रवासीच बसवावेत.
- श्याम सूर्यवंशी,प्रवासी
मास्क असलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश दिला पाहिजे. तसेच बसचे नियमित सॅनिटराईज केले पाहिजे. तसेच बसमध्ये स्वच्छतेलाही प्राधान्य दिले पाहिजे.
- शरद सोनटक्के, प्रवासी
सोमवारपासून बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. धुळे आगारातून नाशिक, औरंगाबाद, चोपडा, जळगाव, यावल या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या. बस सोडण्यापूर्वी त्या सॅनिटराईज करण्यात आलेल्या होत्या. अनलॉक झाल्यानंतर पहिल्या दिवशी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
- स्वाती पाटील,
आगार प्रमुख, धुळे