धुळ्यातील जिनगर गल्लीतील दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:30 IST2018-02-26T21:30:47+5:302018-02-26T21:30:47+5:30
साड्यांचे दुकान फोडण्याचे प्रकार वाढले : १० ते १२ हजाराचा मुद्देमाल लंपास

धुळ्यातील जिनगर गल्लीतील दोन दुकाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या जिनगर गल्लीतील साडी व मेटलच्या वस्तुचे दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून फोडले़ त्यात १० ते १२ हजार रुपयांचा साड्या तसेच मेटलच्या दुकानातून महत्त्वाची कागदपत्रे लंपास झाल्याच्या घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. दरम्यान, शहरात साड्यांचे दुकान फोडण्याचे प्रकार वाढल्यामुळे व्यापाºयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा क्रीडा संकुलातील साडीचे दुकान फोडल्यानंतर वाडीभोकर रोडवरील साडीचे दुकान फोडण्याची घटना ताजी असताना आता पुन्हा साडीचेच दुकान फोडल्याची घटना घडली आहे.
साड्या लांबविल्या
गल्ली नंबर ४, जिंगर गल्ली आणि जेबी रोड क्रॉसिंगवर बाळासाहेब तलवारे यांच्या मालकीचे राजाराम लुकडू वाणी (तलवारे) या नावाने साडीचे दुकान आहे़ रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर दुकानमालक तलवारे हे घरी गेले़ चोरट्याने रात्री दुकानाच्या शेजारुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याने धाब्यावर जात धाबे खोदून काढले़ दुकानात वरतून आत प्रवेश केला़ दुकानातील पैठणी, नऊ वारी, सहा वारी अशा १० ते १२ हजाराचा मुद्देमाल घेवून पोबार केला़
कागदपत्रे लंपास
यासोबतच त्याच भागात असलेल्या रमेशचंद्र शहा यांचे मालकीचे महालक्ष्मी मेटल या दुकानात सुध्दा चोरट्याने महत्वाची काही कागदपत्रं लंपास केली़