आग्रा रोडवर भाजी विक्रेत्यांमध्ये जुंपली; मित्रांना बोलावून केले चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 21:41 IST2021-03-13T21:41:23+5:302021-03-13T21:41:49+5:30
पत्री खुर्ची परत मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन उफाळला वाद

आग्रा रोडवर भाजी विक्रेत्यांमध्ये जुंपली; मित्रांना बोलावून केले चाकूने वार
धुळे : पत्री खुर्ची परत मागितल्याच्या कारणावरून भाजी विक्रेत्या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एवढ्यावरच न थांबता एकाने आपल्या काही मित्रांना बोलावून चाकूने हल्ला केल्याची घटना धुळ्यातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिराजवळ शुक्रवारी घडली. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शुक्रवारी दुपारी पावणेबारा सुमारास आग्रा रोडवर मयूर वाडिले आणि सोनू बडगुजर या दोघांनी आपआपल्या भाजीपाल्याच्या लोटगाड्या लावलेल्या होत्या. सोनू बडगुजरने मयूरची पत्री खुर्ची घेतली. ती खुर्ची मयूरने परत मागितल्याने त्याचा राग येऊन सोनूने शिवीगाळ सुरू केली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सोनू बडगुजरने फोन करून मित्र कुंदन पाटील, राकेश पाटील, योगेश दर्गे यांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून मयूर वाडिले याला मारहाण सुरू केली. दोघांनी हात धरून ठेवत तिसऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. एकाने मयूरच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे या मारहाणीत मयूर वाडिले हा जबर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मयूर याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात मयूर सखाराम वाडिले (वय २६, रा. देविदास कॉलनी, जुने धुळे) याने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, हल्ला करणारे सोनू बडगुजर याच्यासह कुंदन पाटील, राकेश पाटील, योगेश दर्गे या चारही संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास आझादनगर पोलीस करीत आहेत.