जीप उलटून 14 जण जखमी, 5 गंभीर
By Admin | Updated: October 6, 2015 00:29 IST2015-10-06T00:29:52+5:302015-10-06T00:29:52+5:30
चांदसैली घाटातील घटना : मजूर जात होते गुजरातेत ऊसतोडणीसाठी

जीप उलटून 14 जण जखमी, 5 गंभीर
कोठार : सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात धोकादायक असणा:या चांदसैली, ता. धडगाव घाटात ऊसतोड करणा:या मजुरांना गुजरातकडे घेऊन जाणा:या टेम्पोला भीषण अपघात होऊन त्यात 14 मजूर जखमी झाले असून, त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर उर्वरित जखमींना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना चांदसैली घाटात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. चांदसैली, ता. धडगाव येथील ऊसतोड करणारे मजूर सोमवारी नवसारी जिल्ह्यातील गणदेवी येथील साखर कारखान्यात मजुरीसाठी जात होते. टेम्पो (क्रमांक एमएच 15-जी 56) ही चांदसैली घाटातील माकड टेकडीजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वळणावरील पर्वताला जोरदार धडक दिली. यानंतर टेम्पो उलटला. त्यामुळे टेम्पोतील मजुरांच्या जीवनावश्यक साहित्याखाली मजूर दाबले गेले. टेम्पोत लाकडे, भांडी, धान्य व अन्य जीवनावश्यक साहित्य होते. धडक एवढी जोरदार होती की, मजूर जागीच बेशुद्ध पडले. काही मजूर एकमेकांच्या अंगाखाली दाबले गेले. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोग वसावे यांच्या पथकाने तातडीने उपचार केले. अनेक जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, काही मजुरांचे हात फ्रॅर झाले आहेत. अपघातानंतर चालक फरार झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी जखमींचे रुग्णालयात जबाब घेतले.