जवाहर ट्रस्टच्या सिंचन चळवळीची कमाल, बंधारे झाले तुडुंब, नाले खळखळून वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:40+5:302021-07-16T04:25:40+5:30

माजी कृषी व पाटबंधारे मंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व ...

Jawahar Trust's irrigation movement reaches its climax | जवाहर ट्रस्टच्या सिंचन चळवळीची कमाल, बंधारे झाले तुडुंब, नाले खळखळून वाहू लागले

जवाहर ट्रस्टच्या सिंचन चळवळीची कमाल, बंधारे झाले तुडुंब, नाले खळखळून वाहू लागले

माजी कृषी व पाटबंधारे मंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व संकल्पनेतून धुळे तालुक्यात गेल्या ११ वर्षांपासून नाला व बंधारे खोलीकरणाची चळवळ राबविण्यात येत आहे. माथा ते पायथ्यापर्यंत नदी, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले आहे. धुळे तालुक्यात सुमारे १०२ गावांत तब्बल ४०० हून अधिक बंधाऱ्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आज सात हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे. कन्हेरी नदी, वाघी नदी, पांझरेवरील फड बंधारे, विविध पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करून तालुक्यातील सिंचन चळवळीला गती मिळाली आहे. धुळे तालुक्यातील धनूर-तामसवाडी शिवारातील खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलेला नाला यंदा पावसाच्या पहिल्याच टप्प्यात पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. या कामामुळे धनूर, कापडणे, तामसवाडी या गावांतील सुमारे १५० शेतकऱ्यांच्या शेतीला लाभ मिळत आहे. या शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी उंचावली असून, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होऊन उत्पन्न वाढल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

दरम्यान, धनूर येथील चेतन शिंदे, अशोक पाटील, हिरामण चौधरी, कैलास शिवाजी पाटील, शांतूभाई पटेल, साहेबराव कोळी, संभाजी शिंदे, परमेश्वर पाटील, प्रकाश गुजर, आदी शेतकऱ्यांनी पाण्याने भरून वाहणाऱ्या नाल्याला भेट दिली व आमदार कुणाल पाटील यांनी केलेल्या सिंचनाच्या कामामुळे आज आमच्या शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सिंचनाला प्राधान्य : आमदार पाटील

धुळे तालुक्यात माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या संकल्पनेला गती देत मी नेहमीच सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. शेतकरी सुखी झाला तर तालुका समृद्ध होऊ शकतो. त्याकरिता जवाहर ट्रस्टची सिंचन चळवळ प्रभावीपणे राबविली जात आहे. आज त्याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत असून, याचा मला मनस्वी आनंद आहे. यापुढेही ही चळवळ अशीच सुरू ठेवत धुळे तालुका शंभर टक्के बागायती करण्याचा मानस आहे.

- कुणाल पाटील

आमदार, धुळे ग्रामीण

Web Title: Jawahar Trust's irrigation movement reaches its climax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.