शंभर टक्के कर भरूनही जलगंगावासी मूलभूत सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:40+5:302021-08-20T04:41:40+5:30
धुळे : महानगरपालिकेला मालमत्ता कर नियमित भरूनही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या समस्याग्रस्त जलगंगा गृह निर्माण सोसायटीतील रहिवाशांनी प्रशासनासह पुढाऱ्यांनाही ...

शंभर टक्के कर भरूनही जलगंगावासी मूलभूत सुविधांपासून वंचित
धुळे : महानगरपालिकेला मालमत्ता कर नियमित भरूनही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या समस्याग्रस्त जलगंगा गृह निर्माण सोसायटीतील रहिवाशांनी प्रशासनासह पुढाऱ्यांनाही निवेदन देऊन आपल्या समस्या सोडविण्याची आग्रही मागणी केली आहे. जलगंगा सोसायटी परिसर हा शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसेच सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांचा परिसर आहे. येथील रहिवासी मालमत्ता कर नियमित भरतात. परंतु या परिसरात मूलभूत सोयी-सुविधांची वानवा आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या परिसरात अनेक समस्या आहेत. महापालिकेतील पदाधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करीत परिसरातील नागरिक एकत्र आले असून त्यांनी नुकतेच महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनासह स्थायी समिती सभापती संजय जाधव, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल आदींना निवेदन दिले. पिण्याचे पाणी, गटारी, पथदिवे आदी समस्यांचा पाढा त्यात वाचला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जलगंगा सोसायटी, कालिका काॅलनी, जोरावरअल, जलसिंचन, कृषिनगर, शिवनेरी, कुणाल सोसायटी, करुणा विहार, झेंडेनगर, रामनगर, संघमा चाैक, देवचंदनगर या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ७ ते १० दिवसात पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ३ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची मागणी आहे.
साक्री रोड परिसरात या वसाहती गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून वसल्या आहेत. या काळात नगरपालिकेची महानगरपालिका झाली. परंतु नागरी सुविधांचा अभाव कायम आहे. रस्ते, गटारींची सोय नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात रहिवाशांनी लोकवर्गणी गोळा करून रस्त्यांवर मुरूम टाकून कच्चे रस्ते तयार केले होते. पाणी साचत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कुत्रे आणि डुकरांचा वावर आहे. डासांचा प्रादुर्भाव होऊन डेंग्यू, मलेरिया, टायफाईडसारखे साथीचे आजार पसरत आहेत. रस्ते, गटारींसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये दलित वस्तीचा निधी दोन वेळा सवर्ण वस्तीमध्ये खर्च केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. संघमा चाैक, रामनगर, देवचंदनगर, कृषीनगर, तुळजाई, करुण विहार हा ९५ टक्के दलित वस्तीचा परिसर असताना दरवर्षी मिळणारा १ कोटी रुपयांचा निधी बाहुबलीनगर, अजबेनगर, साईकृपा सोसायटी या बिगर दलित वस्तीमध्ये खर्च केला जात आहे.
बारा कोटींचा बोगस रस्ता
महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या नगरोत्थानच्या १०० कोटींमधून १२ कोटी रुपये खर्च करून धान्य गौदाम ते बायपास हायवेपर्यंत माॅडर्न रस्ता केला जात आहे. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट आणि सदोष असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रस्त्याचे अंदाजपत्रक फुगविण्यासाठी रस्त्याची मूळ उंची दोन ते तीन फुटांनी वाढवली आहे. गटारींची उंचीदेखील वाढली. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या काॅलन्यांमध्ये पाणी साचत आहे. अंदाजपत्रकात भूमिगत गटार असताना प्रत्यक्षात मात्र खुली गटार केली जात आहे. पाण्याचा निचरा होण्याची सोय संबंधितांनी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर जलगंगा सोसायटीचे अध्यक्ष बी. डी. सूर्यवंशी, उपाध्यक्ष हरिचंद्र लोंढे, भगवान पाटील, बी.ए. मराठे, बी. बी. पाटील, पी.के. जोशी, गोपीचंद पांडव, भीमसिंह राजपूत, अशोक इशी, तुकाराम बैरागी, नाना देवरे यांच्यासह परिसरातील शेकडो रहिवाशांच्या सह्या आहेत.