मजुरांसाठी ठरली ‘ती’ काळ रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:28 IST2019-12-01T12:27:42+5:302019-12-01T12:28:26+5:30
विंचूर पुलावरुन पिकव्हॅन कोसळली, ८ ठार

मजुरांसाठी ठरली ‘ती’ काळ रात्र
धुळे : पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेल ते काम आणि वाटेल तिथे जाण्याची मनापासून तयारी असलेले मजूर हे नेहमी प्रमाणे पिकअप व्हॅनमध्ये बसले़ व्हॅन बडवानीकडून निघाली़ रातोरात त्यांना बीड येथे पोहचायचे असल्याने चालकाने देखील सुसाट वाहन चालविले़ रस्ता सामसूम असलातरी पुलावरील खड्डे आणि कठडे नसल्याने घात झाला़ त्यात पुन्हा रस्त्यावर किर्र अंधार असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन बोरी-कानोली नदीत जावून कोसळले़ आपण कोसळणार आहोत आणि आपला मृत्यू समोर असल्याची पुसटशीही कल्पना नसलेले ७ जीव जागेवरच आणि एक महिला रुग्णालयात मरण पावली़ नदीच्या दगडावर कोसळलेल्या व्हॅनने पाण्यातच दोन ते तीन पलटी घेतली़ क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले़
मजुरांना घेऊन व्हॅन निघाली
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ या रोडवर मध्यप्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्या व धवल्यागिरी येथून एमएच २५ पी ३७७० क्रमांकाच्या पीकअप वाहनात मजुरांना बसविण्यात आले़ त्यांच्यासोबत त्यांचा परिवारही होता़ याशिवाय ज्वारी, संसारोपयोगी साहित्य आणि आवश्यक ते कपडे घेऊन मजूर निघाले़ व्हॅन धुळेपर्यंत सुखरुप आली़ पुढे ही शनिवारची रात्र आपल्यासाठी अखेरची ठरेल याची पुसटशी देखील कल्पना या मजुरांना नव्हती़ व्हॅन धुळे तालुक्यातील गरताड गाव ओलांडल्यानंतर विंचूर गावानजिक बोरी-कानोली नदीच्या पुलापर्यंत आली़ व्हॅन भरधाव वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले़ पुलावर कोणत्याही प्रकारचे कठडे नाही, रस्त्यावर खड्डे आणि अंधार यामुळे काही कळण्याच्या आत व्हॅन थेट नदीत जावून कोसळली़
क्षर्णाधात होत्याचे नव्हते
व्हॅन नदीत कोसळणार असल्याचे काहीही वाटत नसताना मात्र तसे घडले़ व्हॅनमध्ये मजुरांसह त्यांची लहान मुले आणि परिवार होता़ त्यांच्यासोबत आवश्यक ते सर्व साहित्य होते़ व्हॅन ४० फुट नदीत कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आवाज झाला़ नदीपात्रात दगड असल्यामुळे व्हॅनने पलटी घेतली़ सर्व साहित्य नदीत तर गेले शिवाय व्हॅनमध्ये बसलेले ७ जणांनी आपले प्राण तिथेच सोडले़ यात ५ बालकांचा समावेश होता़
विंचूर गाव एकवटले
भरधाव व्हॅन नदीत कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर आवाज झाला़ आवाज येताच नदीलगत असलेल्या विंचूर गावापर्यंत जखमींच्या किंकाळ्या ऐकू आल्या़ क्षणार्धात आवाजाच्या दिशेने गावकºयांनी धाव घेतली़ रात्रीच्या सुमारास नदीत धाव घेऊन व्हॅनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले़ यावेळी जखमींच्या आरोळा आणि किंचाळ्या कानी आल्यामुळे अनेकांचे हृदय हेलावून सोडले होते़ घटनेची माहिती मिळताच धुळ्यातून चार रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या आणि चाळीसगावहून एक रुग्णवाहिकाही दाखल झाली़
चिमुकल्यांना दूध पुरविले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर धुळ्यातील मोगलाई भागातील लक्ष्मीनगरात राहणारे शाहरुख युसुफ पठाण (२१) याने आणि दुसºया रुग्णवाहिकेचा चालक सचिन दिलीप थोरात यांनी स्वत:हून पुढाकार घेतला़ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले़ रात्रीची वेळ आणि लहान मुले असल्याने त्यांनी त्या जखमी चिमुकल्यांची भूक भागविली़ त्यांना तातडीने दूध, बिस्कीट देवून शांत करण्याचा प्रयत्न केला़
अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
बडवानी जिल्ह्यातील धवल्यागिरी येथील मुकादम तुफानसिंग बारेला हा दरवर्षाप्रमाणे मजूर घेऊन बीड जिल्ह्याकडे जात होता़ तसा यंदाही त्याने त्याच दिशेने मजूर नेले़ त्यानुसार, मजुरांसाठी पिकअप व्हॅनची देखील सुविधा करण्यात आली होती़ चालक सागर भारत तांबारे (रा़ आंदोरा ता़ कळंब जि़ उस्मानाबाद) हा वाहन चालवित होता़ व्हॅन वेगाने असल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन ही नदीत कोसळली़ याप्रकरणी लेदाराम गरदान आर्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़