गाव पातळीवरील शासकीय यंत्रणांना मुख्यालयी रहाणे बंधनकारक करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:27+5:302021-04-27T04:36:27+5:30
मालपूर कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनत असताना प्रशासनाचे मुख्य दुवा समजले जाणारे ग्रामविकास अधिकारी, महसूलचे तलाठी तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...

गाव पातळीवरील शासकीय यंत्रणांना मुख्यालयी रहाणे बंधनकारक करावे
मालपूर कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनत असताना प्रशासनाचे मुख्य दुवा समजले जाणारे ग्रामविकास अधिकारी, महसूलचे तलाठी तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे एकही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी वास्तव्य करत नसल्यामुळे कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत गाव बेवारस असून वेळप्रसंगी मोबाईलवरुन झाल्या प्रकाराची माहिती दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अपेक्षित गतिने होत नाही. परिणामी पाॅझिटिव्ह रुग्ण सुपर स्प्रेडर ठरुन रुग्ण वाढीचा धोका बळावत चालला आहे. यासाठी जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याप्रमाणे शिंदखेडा तालुका बीडीओ यांनी सर्वांना मुख्यालयी रहाणे बंधनकारक करावे अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पाटील यांनी केली असून अन्यथा गावे उजाड होण्यास वेळ लागणार नाही, असे म्हटले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मालपुरातील शासकीय यंत्रणा, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ देखील प्रचंड सतर्क होते. युवक रात्रंदिवस गावाच्या वेशीवर खडा पहारा देताना दिसून येत होते. कोरोना हाॅटस्पाॅट किंवा बाधित क्षेत्रातून आल्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करेपर्यंत नजर ठेवत होते तर गावात कोणाच्या घरी कोण आले आहे इथपर्यंत सतर्कता बाळगली जात होती. मात्र आता या सर्वांची खरी गरज असतांना सर्वच बेफिकीर झाले आहेत. आता तर पाॅझिटिव्ह रुग्ण गावात बिनधास्त हिंडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी गाव स्तरावर विलगीकरण कक्ष स्थापन करुन प्रत्येक पाॅझिटिव्ह रुग्णाला तेथे ठेवून उपचार किंवा बंदिस्त करणे आवश्यक आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर स्थानिक कोविड समितीने दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करावी तरच रुग्ण संख्या आटोक्यात येईल अन्यथा भस्मासूर माजायला वेळ लागणार नाही. यामुळे नुसते गाव उजाड होणार नसून अनेकांच्या घराला कडी लागेल एवढी परिस्थिती गंभीर होणार असल्याचे यातील तज्ज्ञ सांगताना दिसून येत आहेत. यासाठी आता गाव पातळीवरील शासकीय यंत्रणांना या संकटाच्या समयी मुख्यालयी थांबणे सक्तीचे करावे. प्रभावी उपाययोजना योजून गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापणे सध्याच्या घडीला गरजेचे आहे. असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चर्चा होताना दिसून येत आहे.