उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:39+5:302021-08-13T04:40:39+5:30
भूषण चिंचोरे धुळे - श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे; त्यामुळे भगर आणि साबुदाण्याचे भाव ...

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !
भूषण चिंचोरे
धुळे - श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे; त्यामुळे भगर आणि साबुदाण्याचे भाव वाढले आहेत. मागील काही काळात आरोग्य व आहाराबाबत जागृतीही वाढली आहे. साबुदाणा हा पचण्यासाठी जड आहे; तसेच वाढलेले भाव यामुळे साबुदाणा न खाल्लेलाच बरा, याकडे कल वाढला आहे. आहारतज्ज्ञदेखील उपवासाला साबुदाणा खाणे आरोग्यासाठी हानिकारक असून त्याऐवजी भगर, राजगिरा, आदी पर्याय सुचवीत आहेत.
दर का वाढले?...
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. यंदा साबुदाण्याच्या तुलनेत भगरीला मोठी मागणी आहे. भगरची आवक घटली आहे. तसेच अनेक नागरिकांनी उपवासाच्या आहारात साबुदाण्याऐवजी भगरीचा समावेश केला आहे. मागणीत वाढ झाल्याने दर वाढले आहेत.
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
- साबुदाणा आरोग्यासाठी हानिकारक आहे. साबुदाणा खाऊ नये असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.
- साबुदाणा हा पचनासाठी जड आहे. साबुदाणा खाल्ल्याने ॲसिडिटी वाढण्याची शक्यता अधिक असते.
- साबुदाण्यात साखरेचे प्रमाण अधिक असते (स्टार्च); त्यामुळे साबुदाणा खाणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते.
उपवास आहे, मग हे पदार्थ खा !
पचनसंस्थेला आराम मिळावा, हा उपवासाचा उद्धेश असतो. त्यामुळे उपवासाला अल्प आहार घ्यावा. साबुदाणा पचण्यासाठी जड असतो. त्याऐवजी राजगिरा व भगर खाणे चांगले आहे. उकळलेले बटाटे व उकळलेली रताळेदेखील खाऊ शकता. केळीच्या पिठाचे थालीपीठ हादेखील एक चांगला पर्याय आहे.
- डॉ. धवल कलाल, आहारतज्ज्ञ
उपवासाच्या पदार्थांचे दर ( प्रतिकिलो )
भगर
१० जुलै - ९०
१० ऑगस्ट - ११०
साबुदाणा
१० जुलै - ४५
१० ऑगस्ट - ५५
नायलॉन साबूदाणा
१० जुलै - ६०
१० ऑगस्ट - ७०