तामथरे येथील शाळा खोली बांधकामाचा मुद्दा गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:09 IST2020-05-29T22:09:32+5:302020-05-29T22:09:55+5:30
जिल्हा परिषदेची स्थायी सभा : गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सीईओंचे आदेश

तामथरे येथील शाळा खोली बांधकामाचा मुद्दा गाजला
धुळे : तामथरे (ता.शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळा खोली बांधकामात झालेल्या अपहार प्रकरणाचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला. अपहार प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यास उशीर करणाºया गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी असे आदेश मुख्याधिकारी वान्मथी सी. यांनी आज दिले.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा डॉ. तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात ही सभा झाली. व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामकृष्ण खलाणे, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी उपस्थित होते.
सभेत चिमठाणे गटाचे सदस्य विरेंद्र गिरासे यांनी तामथरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामच्या अपहाराचा मुद्दा उपस्थित केला. संबधीत शिक्षकाला निलंबित केले नाही, गुन्हा दाखल करण्यास उशीर केला अशी बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
यावर उत्तर देतांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनिष पवार म्हणाले की, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाकडून रक्कम वसुल करण्यात येणार होती. मात्र ती झालेली नाही.
दरम्यान वान्मथी सी. म्हणाल्या, हा प्रकार गंभीर आहे. संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.
सभेत आरोग्य विभागाचा मुद्दाही गाजला. सदस्य पोपटराव सोनवणे यांनी जिल्ह्यातील भरारी पथकांतील अधिकारी व त्यांच्या वाहनांची माहिती विचारणा केली.
त्यावर आरोग्य अधिकाºयांनी जिल्ह्यात १६ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांना वाहनांची निविदा प्रक्रीया सुरु असल्याची माहिती दिली. त्यावर आक्षेप घेत, सोनवणे यांनी काळ्यायादीतील ठेकेदाराला ही निवीदा देण्यात आल्याचा आरोप केला.तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी केली.