धुळे : धुळे तालुक्यातील अजंग येथील सुनील रामचंद्र माळी (४३) या इसमाचा मृतदेह पिंप्री शिवारात आढळून आला़ सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती, चाळीसगाव रोड पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करुन अखेर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश मिळविले़ राहुल सुनील माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़शहरालगत पिंप्री गावातील काही लोकांना हा मृतदेह दिसून आला होता़ त्यामुळे एकच खळबळ उडाली होती़ त्या इसमाला कोणीतरी मारून फेकले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील पिंप्री शिवारात हॉटेल सुल्तानियाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या माळरानावर एका नाल्यालगत अनोळखी इसम मृतावस्थेत पडला असल्याचे आढळून आला होता़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती़ मृतदेहाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला असल्याचे दिसून आल्याने त्याचा कोणीतरी खून केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ अशातच हा मृतदेह अजंग येथील सुनील रामचंद्र माळी यांचा असल्याचे समोर आले़ सध्या त्यांचे वास्तव्य मोहाडी शिवारात होते़ पोलिसांचा तपास सुरु झाला आहे़
अजंग येथील इसमाचा पिंप्री शिवारात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:54 IST