साक्री रोडवर अनियमीत अन् दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 21:53 IST2020-05-31T21:52:41+5:302020-05-31T21:53:51+5:30
नागरिकांच्या तक्रारी : आठ दिवसानंतर होतो पाणीपुरवठा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील साक्री रोड परिसरात ऐन उन्हाळ्यामध्ये अनियमीत आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
गेल्या दोन महिन्यांपासून साक्री रोड परिसरात पाणीपुरवठा अनियमीत असल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत़ शितल कॉलनी, गणेश कॉलनी, महसुल कॉलनीत आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ कधी हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रावर तर कधी जुन्या एसआरपी कॅम्पमधील नळावर जावून पाणी आणावे लागत आहे़ शिवाय नळाला दूषित, गढूळ पाणी येत आहे़
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला़ धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये मुबलक जलसाठा आहे़ परंतु महानगरपालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत़ येथील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कुणी तयार नसल्याचे सांगत येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे़
साक्री रोडवरील कॉलनी परिसरात नियमित आणी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी विशाल पाटील, अतुल जीरे, शुभम भदाणे, मयुर अढाव, भुषण राजपुत, कीरण सोनवणे, आदर्श जाधव, यश सावंत, सागर राजपुत, मयुर पाटील यांच्यासह नागरिकांनी केली आहे़
कॉलनी परिसरासह मोगलाईतही तीच परिस्थिती आहे़ पाण्यासाठी आंदोलन करणाºया फुले नगरातील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़