लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबूड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर टाकतात दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST2021-09-14T04:42:17+5:302021-09-14T04:42:17+5:30
धुळे - शहर व जिल्ह्यात सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण मोहिमेत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप ...

लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबूड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर टाकतात दबाव
धुळे - शहर व जिल्ह्यात सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण मोहिमेत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डॉक्टर व लसीकरण करणारे आरोग्य कर्मचारी देखील दबावात वावरत आहेत.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु झाले होते. आता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येत असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. लसीकरणातील वाढत्या दबावामुळे आरोग्य कर्मचारी तणावात आहेत.
ही घ्या उदाहरणे
१ कोरोना लसीकरण मोहिमेत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. देवपूर येथील लसीकरण सुरु असलेल्या मनपाच्या दवाखान्यात ओळखीच्या व्यक्तीला आधी लस मिळावी यासाठी वाद घातला होता. लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असतानाही या पुढाऱ्याने वाद घातला होता.
२ लसीकरण कोणत्या केंद्रावर घ्यावे यासाठीही राजकीय पुढारी दबाव टाकतात. मनपाच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण केंद्राच्या यादीतही पुढारी बदल करायला लावत असल्याची माहिती एका आरोग्य कर्मचाऱ्याने दिली. विशिष्ट केंद्रावरच लसीकरण व्हावे यासाठी पुढाऱ्यांचा आग्रह असतो.
३ लसीकरण केंद्रांवर सकाळपासून रांगा लागलेल्या असतात. राजकीय पुढारी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना रांगेत उभे न राहता लस मिळाली पाहिजे असे वाटते. काही डोस शिल्लक ठेवावे दबाव टाकला जातो. एका केंद्रावर मात्र नागरिकांनी वाद घालत चक्क किती डोस झाले ते पाहण्यासाठी रजिस्टरच तपासले होते.
१५ हजार डोस शिल्लक
- जिल्ह्यतील लसीकरण केंद्रांवर १५ हजार २१० डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
- लसींचा पुरवठा वाढला असल्याने लसीकरणाची गतीही वाढली आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरल्याने भीती कमी झाली आहे. त्यामुळे अनेकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही.
११ हजार एडी सिरिंज -
कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा वाढला आहे. कॅव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तसेच ११ हजार एडी सिरिंज उपलब्ध आहेत.
पहिला डोस - ६९८८७५
दुसरा डोस - २५७६०३