धुळे जिल्ह्यातील रावेर ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:19 IST2019-11-06T11:18:51+5:302019-11-06T11:19:08+5:30
गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश : विकास कामांबाबत ग्रामपंचायत सदस्याने केली होती तक्रार

धुळे जिल्ह्यातील रावेर ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी होणार
आॅनलाइन लोकमत
धुळे :तालुक्यातील रावेर ग्रामपंचायतीमार्फत १४ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी करण्याचे आदेश धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. ७ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रा.प.) हे चौकशी करणार आहेत.
रावेर येथील ग्रामपंचायती मार्फत १४ व्या वित्त आयोगांतर्गत प्रत्यक्ष विकास कामे न करता, ती पूर्ण झाल्याचे दाखवून शासनाची लाखो रूपयांची फसवणूक झाली असून, या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरसाठ यांनी केली होती. या संदर्भात २ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या वृत्ताची दखल घेऊन धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकाºयांनी रावेर येथील ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ॅ विस्तार अधिकारी ७ नोव्हेंबर रोजी रावेर ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाचा निधी, सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चारवर्षात झालेल्या कामाबाबतचे रोख किर्द, बॅँक पासबुक, चेकबूक, खर्चाचे प्रमाणके, झालेल्या कामांचे अंदाजपत्रके आदी आदी आवश्यक असलेल्या अभिलेखांसह ग्रामपंचायतीत उपस्थित रहावे असे आदेश ग्रामविकास अधिकाºयांना दिले आहेत.
दरम्यान या संदर्भात सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. तसेच दोन्ही गटाचे जबाब घेऊन अहवाल धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकाºयांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती चौकशीसाठी नियुक्त झालेले ग्रामविस्तार अधिकारी रोहिदास महिंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. दरम्यान आता चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे रावेर येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे.