पाणलोटची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना : आदर्श गाव समितीची कर्ले गावाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:13+5:302021-09-15T04:41:13+5:30
पोपटराव पवार यांच्या समितीत काम करणारे आदर्श गाव समितीचे सदस्य गणेश तांबे यांनी सोमवारी कर्ले गावाला भेट देऊन आढावा ...

पाणलोटची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना : आदर्श गाव समितीची कर्ले गावाला भेट
पोपटराव पवार यांच्या समितीत काम करणारे आदर्श गाव समितीचे सदस्य गणेश तांबे यांनी सोमवारी कर्ले गावाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी तांबे म्हणाले की, आदर्श गाव योजनेत कंपार्टमेंट बंडिंगची कामे सुरुवातीला करावीत. त्यातून १ हेक्टरमध्ये १०० टँकर पाणी जमिनीत जिरते. परिणामी, गावाचे वाहून जाणारे पाणी गावातच अडविण्यासाठी मोठी मदत होत असते. त्यासोबत गाभा क्षेत्रातील जास्तीत जास्त कामे तांत्रिक मंजुरी घेऊन प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक असल्याचे तांबे यांनी यावेळी नमूद केले.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश ठाकरे म्हणाले की, गाभा क्षेत्रातील कामासोबत बिगर गाभा क्षेत्राचा निधी देण्याची गरज असून, ग्रामंपचायत इमारत पडल्यामुळे गावाला इमारत नाही. अशा स्थितीत विशेष बाब म्हणून बिगर गाभा क्षेत्रातील इमारतीच्या कामाला मंजुरी द्यावी, तसेच वन विभागाच्या माध्यमातूनदेखील सीसीटी, डीप सीसीटी, वृक्षलागवड, अशी कामे आराखड्यात मंजूर आहेत; परंतु वन विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. शिवाय वृक्षलागवड फक्त पावसाळ्यात होऊ शकते. आता पावसाळा संपत आला. त्यामुळे किमान पुढील वर्षी तरी वन विभागाने ही कामे करावीत, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
यावेळी उपसरपंच गोकुळ बेडसे, अतुल भारती, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, देवीदास पाटील, परमेश्वर पाटील, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष निंबा पाटील, सुरेश चव्हाण, सुनील देवरे, भिकन देवरे, संजय बेडसे, सागर चव्हाण, मनोहर बेडसे, रतीलाल पगारे आदींची उपस्थिती होती.