जवानावर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराच्या जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:37 IST2021-07-27T04:37:45+5:302021-07-27T04:37:45+5:30
जवान नीलेश अशोक महाजन हे मणिपूर राज्यात सेवा बजावत असताना त्यांना गोळी लागली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर गुवाहटी (आसाम) ...

जवानावर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराच्या जागेची पाहणी
जवान नीलेश अशोक महाजन हे मणिपूर राज्यात सेवा बजावत असताना त्यांना गोळी लागली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर गुवाहटी (आसाम) येथील सैनिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे कळंबू (शहादा) येथील रहिवासी असलेले नीलेश महाजन यांच्यावर सोनगीर येथील दोंडाईचा राज्य मार्गालगत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराची जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी चबुतरा तयार करण्यात आलेला आहे. अंत्यसंस्काराच्या जागेची तहसीलदार गायत्री सौंदाणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सरपंच रुखमाबाई ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शामलाल मोरे, मंडळ अधिकारी आर. बी. राजपूत, तलाठी जितेंद्र चव्हाण, धाकू बडगुजर, ग्रामपंचयात सदस्य अल्ताफ हाजी, विशाल कासार, रवींद्र बडगुजर, यशवंत धिवरे, शरद माळी, कुणाल देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्याची डागडुजी
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने अंतिम यात्रेच्या मार्गाची डागडुजी केली जात आहे. तसेच गावातील मुख्य मार्गावर शहीद नीलेश महाजन यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे डिजिटल फलक लावून तिरंगा ध्वज जागोजागी लावण्यात आला आहे.
दरम्यान, जवान नीलेश महाजन यांच्यावर मंगळवारी अथवा बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येण्याची शक्यता आहे.