थाळनेरला पाणीपुरवठा योजनेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:55+5:302021-03-26T04:35:55+5:30
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये एक कोटी ...

थाळनेरला पाणीपुरवठा योजनेची चौकशी
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये एक कोटी २७ लाख ६९ हजार ७४३ रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेचे काम ठेकेदाराने १५ महिन्यांत पूर्ण करून त्यानंतर किमान तीन वर्षे योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक होते. योजना पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदाराला अंतिम देयके अदा करण्यात येणार होती. परंतु ठेकेदाराने संथगतीने व निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे ४ वर्षांनंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या होत्या. याबाबत पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांनी गटविकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी शिरपूर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. धुळे यांना लेखी कळविले होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद धुळे यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन पाणीपुरवठा योजना कामाची चौकशी करून अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करण्यासंबंधीचे पत्र उपअभियंता साखरे यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तब्बल एक महिन्यानंतर साक्री येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता ए.आर. पाटील यांनी थाळनेरला चौकशीसाठी भेट दिली. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने बसस्थानकाजवळील पाण्याची टाकी, जमादारपाडा, दामशेरपाडा, मच्छी बाजार आदी भागांत जाऊन पाहणी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांवर नागरिकांनी तोंडी तक्रारींचा भडिमार केला. नागरिकांनी अनेक भागांत जुन्या पाइपलाइनद्वारे पाणी येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक भागांत आजपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीच आले नसल्याचे सांगितले. तसेच अनेक ठिकाणी पाण्याची गळती दाखविली. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही बोलून दाखवली.
या वेळी पंचायत समिती सदस्य विजय बागुल, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, श्याम भील, विकास सोसायटीचे चेअरमन दिनकरराव पाटील, मुकेश ठाकरे, कुबेर जमादार, दिलीप कोळी, रवींद्र तवर, रामकृष्ण बोरसे, अक्षय पाटील, भैरव जमादार, सुनील पाटील, ग्राम विकास अधिकारी वेताळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सदर अधिकाऱ्यांनी २/३ तासांत चौकशी आटोपती घेतल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.