जिल्ह्यातील साडेपाच लाख घरांची माहिती घेतली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:32 IST2019-11-30T23:31:47+5:302019-11-30T23:32:25+5:30
आर्थिक जनगणना : सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

Dhule
धुळे : जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातव्या आर्थिक गणनेस प्रारंभ झाला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ८१२ शहरी व ३ लाख ३५ हजार ७७१ ग्रामीण असे ५ लाख ३१ हजार ५८३ एवढ्या गणना घरांची माहिती घेण्यात येईल. त्यासाठी ७१२ प्रगणक व २८३ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.
शासनास विविध बाबींसंदर्भात धोरण ठरविण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून आर्थिक गणना आयोजित केली जाते. निरनिराळे लघुउद्योग, सेवा, लघु निर्मिती संस्था, आर्थिक उपक्रम आदींचा अर्थव्यवस्थेतील वाटा, त्यात कार्यरत असलेले कामगार, गुंतवणूक, यंत्रसामग्री तसेच विविध भौगोलिक क्षेत्रानुसार त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये यांचा समग्र अभ्यास होण्यासाठी मूलभूत माहिती एकत्रित करणे हा आर्थिक गणनेचा महत्वाचा उद्देश आहे.
सातव्या आर्थिक गणनेत प्रथमच ही गणना एका कंपनीमार्फत करण्यात येईल. तसेच ही गणना माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आॅनलाइन मोबाईल अप्लिकेशनद्वारे करण्यात येईल. त्यामुळे डाटा कलेक्शन व डाटा एन्ट्री या दोन्ही बाबी एकाच वेळी होतील.
या गणनेसाठी प्रगणकांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच ग्राम पातळीवर ग्रामसेवक, तलाठी सहकार्य करतील, तर पोलिस ठाण्यांनाही सातव्या आर्थिक गणनेबाबत प्रगणक गावागावांत जातील, असे कळविण्यात आले आहे. आर्थिक गणनेबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास नागरिकांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालय अथवा सीएससी प्रतिनिधींशी कार्यालयीन वेळेत जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींनी नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करून शासनाच्या कार्यक्रमात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे़