गणेशोत्सवानिमित्त ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ स्पर्धा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:36+5:302021-09-10T04:43:36+5:30
यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित ...

गणेशोत्सवानिमित्त ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ स्पर्धा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांची माहिती
यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची आरास केली जाते, छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेशदेखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा-जागर मताधिकाराचा’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाइकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबविता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर अमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर, घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यासाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे.
१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
बक्षिसांचे स्वरूप असे
प्रथम क्रमांक : २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ११ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची दहा बक्षिसे देण्यात येतील. सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल. आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.