पावसाळ्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:55 IST2020-06-01T21:54:50+5:302020-06-01T21:55:12+5:30
पालकमंत्री : आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज, प्रत्येक कार्यालयात नियंत्रण कक्ष

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी दक्षता बाळगत सतर्क राहावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पावसाळ्यासाठी तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा स्तरावर व्यवस्थापन समिती स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली़
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार फारुक शाह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले, कोणतीही नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागाने दक्षता बाळगत सतर्क राहिले पाहिजे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबावे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच महानगरपालिकेने फोम टेंडर खरेदीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून आपला अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करावा.
यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून तेथे कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. आजपासून पावसाची आकडेवारी संकलित करण्यास सुरवात होईल. धुळे जिल्ह्यातील ९२ गावे पूररेषेत येत असल्याचे त्यांनी सांगत सर्व शासकीय विभाग सज्ज असल्याचे सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले, धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय आहे. या विभागाने गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुराच्या वेळी प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. या दलाचे जिल्हा प्रशासनास नेहमीच सहकार्य असते.
पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भदाणे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वास दराडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, सहकार निबंधक मनोज चौधरी आदींनी आपापल्या विभागांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पावसाळ्यातील आपत्ती निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात अतीवृष्टीमुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडल्याने पांझरा नदीला पूर आला होता़ त्यात दोन पुलांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे यंदा प्रशासन अधिक सतर्क आहे़
वादळाचा सामना करण्यासाठी दक्ष रहा
अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे. ते गुजरातच्या दिशेने जात आहे. या वादळामुळे धुळे जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवेगाने वारे वाहतील, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. पावसाचीही शक्यता आहे़ अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीसह अन्य संबंधित सर्व विभागाच्या प्रमुखांनी दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले़