कोविड सेंटरसह व्हेंटीलेटरची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:38 IST2021-03-25T21:38:05+5:302021-03-25T21:38:29+5:30
परिस्थिती गंभीर : शिवेसनेचे जिल्हा प्रशासनाला साकडले

dhule
धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून कोविड सेंटरसह व्हेंटीलेटरची संख्या त्वरीत वाढवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हेंटीलेटर उपलब्ध झाले नाही म्हणून रवींद्र बडगुजर आणि अन्य दोन रुग्णांचा मृत्यू झाला. व्हेंटीलेटर उपलब्ध झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात देखील रवींद्र वाडेकर या प्रक़ृती गंभीर असलेल्या रुग्णाला दाखल करण्यास नकार देण्यात आला. बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नोडल अधिकारी डाॅ. दीपक शेजवळ यांच्याशी संपर्क केल्यावर त्या रुग्णाला दाखल करण्यात आले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेचे कोविड सेंटर त्वरीत सुरु करावे, खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करावेत, खाजगी दवाखान्याच्या बाहेर काेरोना उपचाराचे दरफलक लावावेत, शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारावे, खाजगी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथक नेमावे आदी मागण्याही निवेदनात केल्या आहेत.
निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, पंकज गोरे, संगिता जोशी, मनोज मोरे, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, संजय जवराज, एजाज हाजी, शेखर वाघ, अरुणा मोरे, जयश्री वानखेडे, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, केशव माळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.