कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:31+5:302021-03-16T04:35:31+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कोविड-१९ अंतर्गत होणाऱ्या प्रादुर्भाव प्रतिबंधक करण्यासाठी उपाययोजना बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. सत्तार बोलत ...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कोविड-१९ अंतर्गत होणाऱ्या प्रादुर्भाव प्रतिबंधक करण्यासाठी उपाययोजना बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे , डॉ. विक्रम बांदल, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. महेश मोरे आदीं उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेने कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी बजावली होती तशीच कामगिरी आता बजावणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागांनी आपापसांत समन्वय ठेवत सूक्ष्म नियोजन करत कृती आराखडा तयार करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. नागरिकांना राज्य शासनाचे नियम पालन करण्यास प्रवृत्त करावे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आढळून आलेल्या सहव्याधी रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती आरोग्य यंत्रणेने ठेवावी. कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवावा. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे.
तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटर कार्यान्वित करावेत. पोलीस, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करावी. तसेच कोरोना विषाणूच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. विवाह सोहळ्यांसाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक आहे. तसेच डीजे वाजविण्यास प्रतिबंध करण्यात यावा. आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेसाठी व्यापक अभियान राबवावे, असेही निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.
कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात वेळेत खाटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नियोजन करण्यात यावे. त्याची अद्ययावत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. औषधोपचाराची जादा दराने देयके आकारणाऱ्या रुग्णालयांची पडताळणी करावी. त्यासाठी पथके स्थापन करण्यात यावीत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी जगदाळे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले आदींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालकमंत्री सत्तार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. मात्र, नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यावर कारवाई करण्यात येईल. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागांतील नागरिकांमध्ये प्रबोधन, जनजागृती करावी. नागरिकांनीही विना मास्क फिरू नये. तसेच अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन केले. यावेळी झालेल्या चर्चेत महापौर . सोनार, शव्वाल अन्सारी, श्याम सनेर, युवराज करनकाळ, महेश मिस्तरी, हिलाल माळी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदींनी भाग घेतला. जिल्हाधिकारी जगदाळे यांनी प्रास्ताविक केले.