कांदा लागवड क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:35 IST2020-12-01T13:34:38+5:302020-12-01T13:35:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. ...

कांदा लागवड क्षेत्रात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने विहिरींसह जमिनीतील जलस्रोत चांगलाच वाढला आहे. यामुळे खरीपापेक्षा रब्बी हंगामातील क्षेत्रफळात येथे वाढ होत आहे. उजव्या व डाव्या कालव्याच्या आजूबाजुला देखील बागायती शेतजमिनीत वाढ होताना दिसून येत आहे. यंदा रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पिक आहे. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे व बाजारात कांद्याला चांगला भाव असल्याने येथील शेतकर्यांनी उन्हाळी रांगडा कांद्याला पसंती दिली असून त्यासाठी लागणारे रोपे चांगलीच वाढीस लागली आहेत. साधारणत: रोप तयार झाल्यावर पुढील आठवड्यात रांगडा कांद्याच्या लागवडीस सुरुवात होईल. यावर्षी मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, सुराय, कर्ले, परसोळे, देवी, सतारे, वैंदाणे, ऐचाळे, शनिमांडळ आदी भागात रांगडा कांद्याच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा रोपावरुन व लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेत जमिनीवरुन दिसून येत आहे.
येथील शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो किंमतीचे महागडे कांदा बियाणे लागवडीसाठी रोप म्हणून टाकले आहे. साधारणत: दोन महिन्याचे रोप झाल्यानंतर लागवड होत असते. त्यामुळे कांदा लागवडीच्या हालचाली शेतशिवारात दिसून येत आहे.
खरीपातील कांद्याने यावर्षी येथील शेतकर्यांना दगा दिला. बुरशीजन्य आजारामुळे उत्पादनात मोठी घट आली. कांद्याची पात चांगली वाढीस लागलीच नाही. एकरी फक्त पाच क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून खर्च देखील निघाला नाही. खरीपातील कसर रब्बीत काढण्यासाठी येथील कांदा उत्पादक शेतकरी सरसावले असून मालपूरसह परिसरात कांदा उत्पादनात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. मालपूर येथे बेड, सर पध्दतीने तसेच गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करतात. काही शेतकरी ठिंबक सिंचनाचा देखील आधार घेतात. तर काही स्प्रिंगकलरचा उपयोग करुन कांद्याचे चांगले उत्पादन घेत असतात. रांगड्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. म्हणून हमखास उत्पन्न हाती लागते. कांदा हे नगदी पीक असून कांदा उत्पादनातून येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे.