शिंदखेडा तालुक्यात नियमांची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:25+5:302021-03-16T04:35:25+5:30
मेडिकल दुकाने व दवाखाने सोडल्यास कोणतीच दुकाने गेल्या तीन दिवसांपासून उघडली नाहीत. त्यात आज कृषी सेवा केंद्रेही स्वयंस्फूर्तीने ...

शिंदखेडा तालुक्यात नियमांची अंमलबजावणी
मेडिकल दुकाने व दवाखाने सोडल्यास कोणतीच दुकाने गेल्या तीन दिवसांपासून उघडली नाहीत. त्यात आज कृषी सेवा केंद्रेही स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सामील झाल्याचे दिसून आले.
शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. मात्र, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व निमगूळ आरोग्य केंद्राचे डॉ. हर्षल देशमुख, गावकऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने सध्या येथे कोरोनाला अटकाव बसून रुग्णसंख्या कमी होत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण कमीअधिक प्रमाणात तालुक्यात वाढायला सुरुवात झाली असल्याने शिंदखेडा तहसीलदार सुनील सैदाणे व नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी शहरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून लाॅकडाऊनचा आदेश काढला. शहर चार दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. यासाठी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असून, जे कोणी नागरिक विनामास्क व कारण नसताना फिरत असल्याचे दिसतात, त्यांना पोलिसांचा प्रसाद देत असल्याने शहरात शुकशुकाट दिसून येत आहे. शहरातील शासकीय कार्यालये सुरू असून, तेथेही शुकशुकाट दिसून येत आहे.