वर्ष वाया गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST2021-04-26T04:33:00+5:302021-04-26T04:33:00+5:30
गेल्या मार्चपासूनच कोरोनाचा फटका सर्वांना साेसावा लागतोय. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. गेल्यावर्षी या महाभयंकर संसर्गाचे पहिलेच वर्ष ...

वर्ष वाया गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवा
गेल्या मार्चपासूनच कोरोनाचा फटका सर्वांना साेसावा लागतोय. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. गेल्यावर्षी या महाभयंकर संसर्गाचे पहिलेच वर्ष असल्याने, सुरक्षितता म्हणून राज्य सरकारने पहिली ते नववी, अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थी हिताला प्राधान्य दिल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतच गेला. अशाही स्थितीत दुसऱ्या सत्रानंतर टप्प्या -टप्प्याने शाळा सुरू झाल्या. मात्र पालकांमध्ये भीती असल्याने, अनेकांनी संमतिपत्र दिलेच नाही. शाळा पन्नास टक्के उपस्थितीने सुरू करण्याची परवानगी असली तरी अनेक विद्यार्थी शाळेची पायरी चढलेच नाही. शिवाय दिवसात फक्त चारच तासिका. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी ‘गोंधळा’चा तास कमी नव्हता. पण दीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याचे समाधान होते. मात्र फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली. यात अनेक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक बाधित झाले. त्यामुळे शाळा बंद झाली. दरम्यान, केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर राज्यातच कोराेनामुळे बिकट स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्य शासानने पुन्हा एकदा विद्यार्थी हित लक्षात घेऊन सरसकट पहिली ते ११ वीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. आता दोन वर्षांपासून विद्यार्थी परीक्षाविनाच पुढील वर्गात जात आहे. कोरोना हे संकट असले तरी विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी व्हायला नको याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळा नाही, परीक्षा नाही परंतु पुढील वर्गात प्रवेश यात कोण हुशार, कोणाची प्रगती असमाधानकारक हे समजेनासे झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुटी सत्कारणी लागेल असे नियोजन करायला पाहिजे.