कापडणे येथे कानुमातेचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:26+5:302021-08-17T04:41:26+5:30
कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील कुटुंबे, लोक, देश-विदेशातील कुटुंबातील सदस्य चाकरमानी आपल्या घराकडे गावाकडे न चुकता आले होते ...

कापडणे येथे कानुमातेचे विसर्जन
कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील कुटुंबे, लोक, देश-विदेशातील कुटुंबातील सदस्य चाकरमानी आपल्या घराकडे गावाकडे न चुकता आले होते व मोठ्या आनंदाने कानुबाई मातेचा सण साजरा केला.
कापडणे गावात अनेक चौका-चौकात कानुबाई मातेचा पारंपरिक उत्सव साजरा केला.
कापडणे गावातील चौका-चौकातून कानुमातेची विसर्जन सोहळा मिरवणूक काढण्यात आली. गावात गावपोळ गल्ली, भामरे गल्ली, माळीवाडा अशा विविध ठिकाणी कानुबाई मातेचा उत्सव साजरा केला.
सोमवारी सकाळी सातपासून गावातील घरा-घरातील खान्देशाची लोकमाता कानुबाई मातेच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत बँडच्या धूमधडाक्यात व टॅंकरच्या पाण्याच्या फवाऱ्यात कानुमातेच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी विविध पारंपरिक गाण्यांवर खान्देशी नृत्यावर ठेका धरत नृत्य केले. सोबतच फुगड्यांचा खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.
गेल्या १५ जुलैपासून तब्बल महिन्याभरापासून वरुणराजाने पाठ फिरविली आहे. कानुबाईचा उत्सव हा पावसाच्या सरीत मोठ्या आनंदात व उत्साहाने साजरा केला जात असतो. मात्र पाऊस नसल्याने भाविकांना पाण्याच्या टँकरच्या कृत्रिम पाण्याचा वापर करून कानुबाई मातेचा विसर्जन सोहळा साजरा करावा लागला. विसर्जन सोहळ्याप्रसंगी गावाची ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, पावसाचे आगमन वेळेवर होऊ दे... अशी आराधनाही कानुमातेला भाविकांनी, शेतकऱ्यांनी केली. गावातील बोरसे गल्ली, पोस्ट चौक, जुना दरवाजा चौक, झेंडा चौक, सुतार चौक, गावाचे प्रवेशद्वार, ग्रामदेवता भवानीमाता चौक आदी विविध चौकातून कानुबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढली. अखेर दुपारी गावविहिरीत कानुबाई मातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले.