चालक,वाहक चाचणी पास झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:28+5:302021-09-03T04:37:28+5:30
निवेदनात म्हटले आहे की, धुळे येथील राज्य परिवहन महामंडळ धुळे येथे २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त भागातील भरती झालेले चालक, ...

चालक,वाहक चाचणी पास झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्या
निवेदनात म्हटले आहे की, धुळे येथील राज्य परिवहन महामंडळ धुळे येथे २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त भागातील भरती झालेले चालक, वाहक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु चालक तथा वाहक अंतिम वाहन चालन चाचणी पास झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ आमची पिळवणूक करत आहे. आम्ही कोणत्याही क्षणी आत्महत्या करू शकतो, अशी वेळ धुळे विभागातील अधिकाऱ्यांनी आणली आहे, पगारासाठी साक्री येथील चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली, तसेच आम्हाला नियुक्तीपत्र मिळण्यासाठी आत्महत्या करावी लागेल का? राज्य परिवहन धुळे विभाग आम्ही आत्महत्या करावी का याची वेळ बघत आहे का? असा प्रश्न या उमेदवारांनी विचारला आहे.
..तर धुळे विभागीय कार्यालयात आत्मदहन करणार
चालक तथा वाहकपदाची अंतिम वाहन चालन चाचणी पास होऊन आज एक महिना झालेला आहे, तरी धुळे विभागातील अधिकारी कुठलाही ठोस निर्णय घेत नाही. येत्या आठ दिवसात नियुक्तीपत्र न मिळाल्यास आम्ही सर्व उमेदवार धुळे विभागीय कार्यालयात जाऊन आत्मदहन करू आमच्या आत्मदहनाला सर्वस्वी धुळे विभाग जबाबदार राहील, याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.