नदीपात्रात अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:16 IST2019-11-10T23:15:20+5:302019-11-10T23:16:00+5:30
साक्री तालुका : वर्षभरात कोट्यवधीची वाळू वाहतूक; दंड मात्र अवघा पाच लाख वसूल

dhule
साक्री : तालुक्यात वाळूमाफियांनी प्रचंड हैदोस घातला असून दातर्ती शिवारातून दररोज ४० ते ५० मोठ्या ट्रकद्वारे नाशिक, मुंबई येथे रवाना होत आहेत. यामुळे शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. या वाळू माफियांना महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे वाळूचोरी सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे.
गेल्या वर्षी दातर्ती शिवारातील पांझरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून दातर्ती येथील सरपंच व उपसरपंच यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दातर्ती येथील ग्रामस्थांनी वाळू चोरी बंद केली होती. त्यानंतर पुन्हा वाळूमाफियांनी डोके वर काढले असून दातर्ती शिवारातून दररोज ४० ते ५० मोठे ट्रक तसेच ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. तसेच धमणार व बेहेड या मार्गे नाशिक जिल्ह्यात व मुंबई येथे वाळू पाठवली जात आहे. जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचा उपसा केला जातो.
नदीकाठच्या टंचाईचा फटका
पांझरा नदीच्या पात्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे गेल्या वर्षी नदीकाठच्या गावांमध्ये कधी नव्हे एवढी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. दातर्ती शिवारातून हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून एकाही वाळू माफिया वर गुन्हा दाखल झाला नसल्याने यामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, हे लपून राहिलेले नाही. एवढेच नव्हे तर कोकले, नागाई परिसरातून तसेच कासारे परिसरातूनही वाळूची राजरोसपणे अवैध वाहतूक सुरू आहे. वाळूमाफिया रात्रीतून लाखो रुपये कमवत आहेत. त्याचा मलिदा महसूल व पोलीस खात्याला ही जात आहे. त्यामुळे ही वाळूचोरी कोण रोखणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने सर्वच नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर गेला आहे. त्यामुळे नदीपात्रात सर्वत्र वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. अतिशय चांगल्या दर्जाची वाळू असल्याने तिला नाशिक व मुंबई येथे मोठी मागणी वाढली असल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे.
अवघा पाच लाखांचा दंड वसूल
साक्री तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता गेल्या वर्षभरातून केवळ पाच लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे तर कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी झालेली आहे. तालुक्यात वाळूचा अधिकृत ठेका नसल्याने तसेच ठेके प्रचंड महाग झाल्याने तेथे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मॅनेज करता येते, हा साधा, सोपा फार्म्युला वाळूमाफियांनी सुरू केला आहे. साक्री ते थेट नाशिक, मुंबईपर्यंत नाक्यानाक्यावर वाळूमाफियांची दलालांनी सर्वोच्च यंत्रणा मॅनेज केली आहे यामध्ये नदी पात्रांचे तर प्रचंड नुकसान होतच आहे; परंतु शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. या सर्व प्रकरणाकडे जिल्हाधिकारी तसेच नाशिक विभागीय आयुक्तांनी गांभीर्र्याने लक्ष घालून ही वाळूचोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.
आता कारवाईकडे लक्ष
गेल्या अनेक वर्षांपासून वाळूची अवैध व अमाप उपसा सुरूच असून तक्रारी झाल्यानंतर थातुरमातूर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ठोस स्वरुपाची कारवाई होत नसल्याने संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संततधार पाऊस व वाळूच्या ट्रकांमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली असून नदीपात्राचीही दैना उडत असून े प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष आहे.