शहर बंद तर बाजारपेठ सुरूच जनता कफ्युसाठी प्रशासन सज्ज । महापालिकेकडून करणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:49 IST2020-03-22T12:49:21+5:302020-03-22T12:49:41+5:30
जिल्हा प्रशासनाने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.

dhule
धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी यांनी शनिवारपासून हॉटेल्स, पान टपरी, रसवंती, लग्न समारंभ यांच्यावर ३१ मार्चपर्यंत बंदी आणली आहे. असे असतांना शनिवारी शहरातील हॉटेल्स, रसवंती बंद होत्या. मात्र बाजारपेठेत सुरु होती आणि खरेदीसाठी आग्रारोडवर रोजप्रमाणे गर्दी कायम होती. कोरोना विषाणू पसरु नये यासाठी बाजारपेठेतील गर्दी कमी होऊन लोक घरात बसतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.
शहरात शनिवारी सकाळपासून मुख्य बाजारपेठेतील हॉटेल्स, पान टपरी आणि रसवंती आदी बंद होत्या. परंतू आग्रारोडवर हॉकर्स नेहमीप्रमाणे लोटगाडया घेऊन उभे होते. दिवसभर आग्रारोडवर नागरिकांची गर्दी दिसून आली.कॉलनी परिसरात आणि प्रमुख रस्ते सोडता अन्य ठिकाणी हॉटेल्स, चहा दुकान, पान टपरी सर्रासपणे खुल्या होत्या. गर्दीने रस्ते गजबजलेले होते. बाजारपेठेत गर्दी आणि हॉटेल्स, चहा दुकान, पान टपऱ्या सुरु असतांना प्रशासनाकडून ते बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न होतांना दिसत नव्हते.
पाच रुग्णांची तपासणी
येथील हिरे महाविद्यालयात शनिवारी पाच रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आले नसून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. तपासणी झालेल्या पाच व्यक्तीपैकी चौघे विदेशातून परतले आहेत. त्यापैकी दोन जणांचा दुबई प्रवास झाला आहे. लंडन व ओमान येथून प्रत्येकी एक व्यक्ती धुळ्यात परतला आहे तर पुणे येथून आलेल्या एकाचा समावेश आहे. या रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांचे नमुने न घेता त्यांना घरी पाठविले. त्यांना १४ दिवस घरी एका स्वतंत्र खोलीत राहण्याचा सल्ला दिला.