शिवभोजन केंद्रातून भागतेय गरीबांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:18 IST2020-04-02T21:18:29+5:302020-04-02T21:18:51+5:30
लॉकडाऊननंतरची स्थिती : ठाकरे सरकारची योजना ठरतेय ‘अन्नपूर्णा’

शिवभोजन केंद्रातून भागतेय गरीबांची भूक
धुळे : दिवसभर काम केल्यानंतर रातच्याला घरची चूल पेटेल, आपल्या मुलाबाळास्नी, घरच्या लोकास्नी दोन घास जेवता येईल या विचाराने एरवी राब राब राबणाऱ्या कामगाराचा सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गाडा थांबलाय. अश्या या गोरगरीब, गरजू जनतेची उपासमार होऊ नये म्हणून ठाकरे सरकारची महत्वाकांक्षी असलेली शिवभोजन थाळी लॉकडाऊनच्या काळात या गोरगरीबांसाठी ‘अन्नपूर्णा’ ठरत आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं १० रुपयांऐवजी ५ रुपयांत शिवभोजन थाळी मिळेल असं जाहीर केल्यानंतर धुळ्यात काही शिवभोजन केंद्र चालक गोरगरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण देत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
शट डाऊनमुळे हातावर काम करणाऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांनी उपासी राहू नये यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळीचा दर १० रुपयांवरून ५ रुपये केला. एरवी दुपारी १२ ते २ यावेळेत सुरु राहणारं शिवभोजन केंद्र सध्या सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सुरु राहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टनिंगच पालन, तसेच शासनाच्या सूचनांप्रमाणे योग्य ती दक्षता देखील याठिकाणी घेण्यात येतेय.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थाळीत जेवण न देता पॅकिंग स्वरूपात जेवण देण्यात येतंय. यात भाजी, पोळी, दाल , भात यांचा समावेश आहे. नागरिक घराबाहेर निघत नसल्यानं याचा परिणाम शिवभोजन केंद्रावर झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा प्रतिसाद चांगला असल्याचं शिवभोजन केंद्र चालक सांगतात. तर जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी देखील शिवभोजन केंद्रात सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतात़