बभळाजच्या वन मजुराचे आमरण उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:45 IST2020-03-03T22:44:47+5:302020-03-03T22:45:08+5:30
प्रधान सचिवांना निवेदन : भेदभाव होत असल्याचा आरोप, सेवेत सामावून घेण्याची मागणी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील भागवत बाबुराव कोळी यांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे़ पात्र असताना वारंवार मागणी करुनही नियुक्ती दिली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे़
वन मजुर भागवत कोळी यांनी महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इतर वन मजुरांना आतापर्यंत सेवेत सामावून घेतले आहे़ परंतु काही वन मजुरांना अजुन नियुक्ती दिलेली नाही़ वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील भेदभाव केला जात असल्याने दोन वेळा उपोषणाची नोटीस दिली होती़ परंतु मुख्य वन संरक्षकांनी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषणाचा निर्णय मागे घेतला़ परंतु आता सेवेत सामावून घेण्याचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे़ तसेच काही वन मजुरांना नुकसान भरपाई दिल्यावर सुध्दा सेवेत सामावून घेतल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे़ अशा वन मजुरांची नावे, भरपाई आणि नियुक्ती आदेशाचा दिनांक यांची यादीच त्यांनी निवेदनात दिली आहे़ या वन मजुरांना नियुक्ती मिळते मग आपल्याला का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे़दरम्यान, कोळी यांच्या आमरण उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता़