शेकडो हेक्टरवरील कापूस पीक आडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:16 IST2019-11-13T22:15:44+5:302019-11-13T22:16:19+5:30
कापडणे : उत्पादनात येणार मोठी घट, कापसाची प्रत खालावल्याने दरावर परिणाम

Dhule
कापडणे : कापडणेसह धनुर लोनकुटे, तामसवाडी, कौठळ, बिलाडी, न्याहळोद, नगाव, धमाणे, देवभाणे, सरवड, सोनगीर आदी गावांसह परिसरात ७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अर्धा तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने येथील सोनगीर रस्त्यावरील शेत शिवारातील दिलीप आत्माराम पाटील व विलास आत्माराम पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे डोलदार कापूस पीक जमीनदोस्त झाले.
संपूर्ण शेतात कापूस पीक आडवे पडले असून पिकाला सडू लागले आहे. यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापूस पिकासह खरीप हंगामातील कापणी व काढणीला आलेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, तुर, सोयाबीन, फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ज्वारी, बाजरी, मका या पिकांची कणसे जास्त पाण्यामुळे काळी पडून धान्याला कोंब फुटले आहेत तर गुरांसाठी असलेला चाराही शेतातच सडून खराब झाला आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा खूप मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या परतीचा पाऊस गेल्याने कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. सर्व शेतकºयांनी सोबतच कापूस वेचणीला सुरुवात केल्याने मजूर टंचाई निर्माण झाल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र, कापूस खराब झाल्याने वेचणी मोठ्या फरकाने कमी झालेली दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा कापसाची गुणवत्ता घसरल्याने त्याचा विपरीत परिणाम कापसाच्या दरावर होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही. तसेच पिकासाठी केलेल्या काबाडकष्टाचे मोलही मिळणार नाही. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.
एकिकडे उत्पन्न बुडाले दुसरीकडे गुरांच्या चाºयाचा प्रश्न आ वासून उभा आहे, अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. यामुळे शासनाकडून प्रत्यक्ष मदत केव्हा मिळते, यावरच रब्बीचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.