सुनील बैसाणे
धुळे : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे कामगार, कष्टकऱ्यांची रोजी बंद झाली असली तरी मोफत धान्यामुळे रोटीची मात्र सोय झाली आहे. मे महिन्याचे मोफत धान्य वितरण सध्या सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५०४ मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप झाले आहे. जवळपास निम्मे कुटुंबांना मोफत धान्य मिळाले असून उर्वरित कुटुंबांना आठवडाभरात धान्य वितरीत करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे.
जिल्ह्यात २ लाख ८८ हजार १३७ कुटुंबांसाठी ८ हजार ४३९ मेट्रिक टन धान्य मंजूर झाले आहे. त्यापैकी ४ हजार ५०४ मेट्रिक टन धान्याचे वितरण झाले आहे. आतापर्यंत ५३.३७ टक्के धान्याचे वितरण पुरवठा विभागाने केले आहे. त्यात धुळे शहर आणि तालुक्यात सर्वाधिक ६४. ७० टक्के, साक्री ५०.५१ टक्के, शिंदखेडा ४७.१५ टक्के आणि शिरपूर ४१. २० टक्के धान्य वितरीत झाले आहे.
मे महिना
मे महिन्यासाठी ७ हजार २ मेट्रिक टन गहू आणि ८ हजार ८६८ मेट्रिक टन तांदूळ इतक्या धान्याचे नियोजन आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रति शिधापत्रिका २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळेल. प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. याशिवाय प्रंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना गेल्यावर्षाप्रमाणे प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळणार आहे तसेच दुकानांमध्ये शिल्लक असलेली डाळ प्राधान्याने अंत्योदय लाभार्थ्यांना आणि उर्वरित प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. हे सर्व धान्य मोफत मिळणार आहे. लाभार्थ्यांना पावतीप्रमाणे धान्य घेण्याचे काळजी घ्यावी.
जून महिना
जून महिन्यात अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळणार आहे. गहू २ रुपये किलो, भरडधान्य १ रुपये आणि तांदूळ ३ रुपये किलो मिळेल तसेच १ किलो साखर २० रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे. प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळेल. धान्याचा दर अंत्योदय योजनेप्रमाणेच असणार आहे. प्राधान्य कुटुंबांना साखर मिळणार नाही. जूनमध्ये गहू काही प्रमाणात कमी करून भरडधान्य देण्याचे नियोजित आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत जून महिन्यातदेखील अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.
मे महिन्यात आतापर्यंत ५३ टक्के मोफत धान्याचे वितरण झाले आहे. उर्वरित लाभार्थी कुटुंबांनादेखील वेळेत धान्य देण्यासाठी पुरवठा साखळी कामाला लागली आहे. लाभार्थ्यांनी पावतीप्रमाणे धान्य घ्यावे. दुकानदाराने पावतीप्रमाणे धान्य न दिल्यास पुरवठा विभागाकडे तक्रार करावी - रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी
अशी आहे आकडेवारी
तालुका लाभार्थी कार्ड संख्या मंजूर धान्यसाठा (मे. टन) वितरीत धान्यसाठा (मे. टन) टक्केवारी
धुळे १०७८१६ ३१४१ २०३२ मे. टन ६४.७०
साक्री ७०९७० २१७८ ११०० ५०.५१
शिंदखेडा ५१९७१ १४४३ ६८० ४७.१५
शिरपूर ५७३८० १६७७ ६९१ ४१.२०
एकूण २८८१३७ ८४३९ ४५०४ ५३.३७