आरोग्य योजनेशी संलग्न दवाखाने ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:57 IST2020-06-30T22:56:42+5:302020-06-30T22:57:06+5:30
पालकमंत्री : कोरोनाचा संसर्ग वाढल्यास संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय

dhule
धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भिती शासनाने व्यक्त केली असली तरी धुळे जिल्ह्याची परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नियंत्रणात आहे़ तरीही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री अब्दल सत्तार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
धुळे शहरात आवश्यकतेप्रमाणे पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर लॉकडाऊनचा पर्याय देखील खुला असल्याचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़ यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, खासदार सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारुक शाह, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे आदी उपस्थित होते़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करतानाच हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ५५ खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तातडीने कार्यान्वित करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले़
शहरातील साक्री रोडवरील संस्कार गतीमंद मुलींच्या बालगृहात एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याने संस्थाचालकांसह सर्व कर्मचाऱ्यांची स्वॅब घेवून त्यांना क्वारंटाईन केले आहे़ त्यामुळे या मुलींची काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांनी स्विकारावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे़ त्यामुळे इतर जिल्ह्यातून तसेच कंत्राटी डॉक्टरांच्या भरतीच्या माध्यमातून मनुष्यबळाची उपलब्धता करण्याचा निर्णय घेतला आहे़
शेतकºयांचा संपूर्ण कापूस आणि मका खरेदी केला जाणार आहे़ तसेच बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता आहे़ प्रधानमंत्री पिक विमा योजना आता बंधनकारक नसून ऐच्छिक आहे़ या योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय शेतकºयांनी घ्यावा़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पूर्वतयारी आणि प्रयत्नांची माहिती देताना जिल्हाधिकारी संजय यादव सांगितले की, जिल्ह्यात २५ संस्थांशी चर्चा झाली असून ५०० खाटा सज्ज ठेवण्याची तयारी आहे़ धुळे शहरासह दोंडाईचा, साक्री आणि शिरपूर येथे आॅक्सिजन सप्लायचे पाचशे बेड तयार केले जाणार आहेत़ त्यासाठी आॅक्सिजन पाईपलाईनचे काम अंतीम टप्प्यात आहे़ आरोग्य यंत्रणेची क्षमता दहापट वाढविण्याचे नियोजन आहे़ डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांचे नियोजन केले जात आहे़ तसेच धुळे शहरात बंद असलेले दोन सरकारी दवाखाने सुरू केले जाणार आहेत़ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसारख्या शासकीय योजनांशी संलग्न खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा झाली आहे़ सुरूवातील त्यांनी विरोध दर्शविला होता़ परंतु आता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले असून रोटेशननुसार प्रत्येक जण २१ दिवसांसाठी आपला दवाखाना डॉक्टर आणि कर्मचाºयांसह प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे़ या दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले़
जिल्हाधिकारी यांची खंत
४परप्रांतीयांच्या स्थलांतरामुळे धुळे आणि शिरपूर येथे महामार्गांवर गर्दी होती़ यावेळी मदत आणि व्यवसाय करण्याच्या उद्देशाने संपर्क आल्याने संसर्ग वाढला़ शिरपूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले़ त्यामुळे घरोघरी जावून तपासणी करण्याची मोहिम प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात हाती घेतली आहे़ परंतु नागरिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करीत नसल्याची खंत जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली़ कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत त्यांनी दिले़
कोरोना विषाणूच्या रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा दान करणाºया मोहम्मद आसिफ सगीर अहमद शेख या तरुणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तो महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूमुक्त झाला. सोमवारी प्लाझ्मा दान केले.