‘कोरोना’ची धास्ती,बाजारपेठेत‘सन्नाटा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 15:37 IST2020-03-18T15:36:26+5:302020-03-18T15:37:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू आहे़ त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेच्या दिवशी ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू आहे़ त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेच्या दिवशी दिवसभर अघोषीत संचारबंदी दिसुन आली़
नागरिकांमध्ये कोरोना विषाणुबाबत भीती व्यक्त केली जात आहे़ जिल्हा प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ ‘लोकमत’ च्या टीमने मंगळवारी शहरातील आग्रारोडवर, पाचकंदील परिसर, मच्छीबाजार, पारोळारोड, बारापत्थर, फुलवाला चौक, देवपूर दत्तमंंदिर चौक, कराची वाला खुट परिसरात सर्व्हेक्षण केले़ यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती व दक्षता घेतली जात असल्याने व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आर्थिक फटका बसल्याचे व्यापारी दिलीप जैन यांनी सांगितले़
न्यायालायाचे वेळापत्रक बदलले
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी १७ मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील़ कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत असेल़ दुपारी अडीच वाजेनंतर न्यायालयात कोणीही थांबणार नाही़ असे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी दिले आहेत़ न्यायालयाच्या परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी़ तसेच दुपारी अडीच वाजेनंतर न्यायालयाच्या आवारातील उपहार गृह बंद करावेत़ परिसरात कोणीही पक्षकार, वकील, कर्मचारी आणि नागरिक कोणीही थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी़ रिमांडचे कामकाजही १७ मार्चपासून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत करण्याचे निर्देश देण्यात आले़ अशी माहिती अध्यक्ष अॅड़ पाटील यांनी दिली़
व्हायरस मॅपबाबत आवाहन
जगभरात कोठे कोठे कोरोना व्हायरसची लागण लागलेली आहे याची माहिती घेण्याचा नागरिक प्रयत्न करीत आहेत़ त्याचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांनी नवीन कोरोना व्हायरस मॅप तयार केलेला आहे़ या लिंकवर आपण क्लिक केल्यास आपली आवश्यक ती बँक खात्याची माहिती, पासवर्ड चोरण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी. तसेच कोणी अशी फसवणूक करु नये अन्यथा कारवाई होईल, अशी माहिती अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी दिली़