‘घर वापसी’ने काँग्रेसची समीकरणे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:05+5:302021-06-06T04:27:05+5:30

आमदार प्रा. शरद पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ते कोणत्या पक्षात जाणार यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या ...

‘Homecoming’ will change the equations of Congress | ‘घर वापसी’ने काँग्रेसची समीकरणे बदलणार

‘घर वापसी’ने काँग्रेसची समीकरणे बदलणार

आमदार प्रा. शरद पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ते कोणत्या पक्षात जाणार यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर माजी आमदार प्रा.शरद पाटील हे कोणत्या पक्षात जाणार याबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. सुरुवातीला शिवसेनेत परत सक्रिय होणार, असे सांगितले जात होते. नंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हासुद्धा प्रा.शरद पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे जवळपास निश्चित झाले होते. नंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या धुळे जिल्हा दौऱ्यात ते प्रवेश करतील, अशी चर्चा होती; परंतु दोन वेळेस शरद पवार यांचा दाैरा रद्द झाल्याने प्रवेशाची केवळ चर्चाच ठरली. शेवटी त्यांनी स्वगृही काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील व आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत प्रा.शरद पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

धुळे जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांचा प्रा.शरद पाटील यांनी प्रखर विरोध केला. ते माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील आणि आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासोबत प्रा.शरद पाटील दिसून आले. ते पाहून ‘राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नाही,’ याची प्रचिती आली. आता हे एकत्र आल्याने धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांसोबतच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील, हे मात्र निश्चित आहे.

धुळे ग्रामीण मतदारसंघात प्रा.शरद पाटील हे आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत आल्याने मतदारसंघातील काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळेच प्रा.शरद पाटील यांच्या प्रवेशासाठी स्वत: रोहिदास पाटील आणि कुणाल पाटील हे आग्रही होते, अशी माहिती आहे. ग्रामीणसोबतच आता धुळे शहर विधानसभा मतदारसंघातही पक्षाची ताकद वाढणार आहे. कारण प्रा.शरद पाटील यांनी धुळे शहरातूनच राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. ते धुळे नगरपालिकेत नगरसेवकसुद्धा राहिले होते. त्यांचा शहरात संपर्क चांगला आहे. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील आपला संपर्क चांगलाच वाढविला होता. याचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितच मिळणार आहे. प्रा.पाटील हे पूर्वी काँग्रेस पक्षात धुळे शहरात सक्रिय होते. त्यामुळे पक्षात त्यांचे मित्र व कार्यकर्ते आजही कार्यरत असल्याने त्यांना पक्षात काम करताना काही अडचण येणार नाही. याशिवाय त्यांचा जिल्ह्यातही चांगला मित्र परिवार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांची काँग्रेस पक्षाला मदत होणार आहे.

मुंबईच्या प्रवेश कार्यक्रमात आमदार कुणाल पाटील यांनी आगामी ५ जिल्हा परिषद गटांतील निवडणुकीत स्वबळावर लढून १५ पैकी १२ जागा मिळवू, असे जाहीर केले. १५ पैकी ८ गट तर धुळे तालुक्यातील आहेत. त्यामुळे निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांना माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या मदतीने पक्षाचे वर्चस्व सिद्ध करण्याची संधी चालून आली आहे. त्या संधीचे दोन्ही मिळून किती फायदा घेतात, हे स्पष्ट होईल.

पक्षातील समीकरणे बदलतील - प्रा.शरद पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्हा काँग्रेसमधीलही समीकरणे बदलतील हेही निश्चित आहे. त्यांना पक्ष काय जबाबदारी देईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या प्रवेशामुळे पक्षातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत, हे मात्र निश्चित. कारण त्यांच्या प्रवेशामुळे आपले महत्त्व व पद जाईल, अशी भीती अनेकांच्या मनात आहे.

साक्रीत काँग्रेसला मिळाला स्ट्राँग डोस - या प्रवेश कार्यक्रमात माजी जि.प. सदस्यांचीही पक्षात ‘घर वापसी’ झाली आहे. त्यामुळे साक्रीत काँग्रेस आणखी स्ट्राँग झाली आहे. तालुक्यातील पक्षातील मातब्बर नेते शिवाजी दहिते यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर साक्रीत काँग्रेस जवळपास संपण्यात जमा होईल, अशी चर्चा होती; परंतु तालुक्यातील पक्षातील माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी जि.प., पं.स. निवडणुकीत चांगली कामगिरी करून पंचायत समितीची सत्ता काबीज केली आणि आता पक्ष सोडून गेलेल्या माजी जि.प., पं.स. सदस्यांना स्वगृही आणत असल्याने पक्षाला आणखी स्ट्राँग डोस मिळाला, असे स्पष्ट होते.

Web Title: ‘Homecoming’ will change the equations of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.