महामार्ग सुरक्षा अधिकाऱ्यांनी खचलेल्या रस्त्याची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST2021-07-25T04:30:07+5:302021-07-25T04:30:07+5:30
नेर येथून जाणाऱ्या महामार्गाचा पहिल्याच पावसात भराव वाहून गेला आहे, तर अनेक ठिकाणी पाण्याने खचला आहे. त्यामुळे या महामार्गाचे ...

महामार्ग सुरक्षा अधिकाऱ्यांनी खचलेल्या रस्त्याची केली पाहणी
नेर येथून जाणाऱ्या महामार्गाचा पहिल्याच पावसात भराव वाहून गेला आहे, तर अनेक ठिकाणी पाण्याने खचला आहे. त्यामुळे या महामार्गाचे अत्यंत निकृष्ट काम होत असल्याने भविष्यात या महामर्गावर अनेकांचे जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी महामार्ग सुरक्षापथकाने पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त दिल्याने त्याची दखल घेऊन महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे हे आपले सहकारी पोलीस नाईक विनोद सरदार, अतुल पाटील, तुषार सूर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते. त्यांनी त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या. तसेच भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या महामार्गावर काय केले पाहिजे, यासाठी पुन्हा कोंडाईबारी घाटापर्यंत सर्व्हे केला. यात त्यांना आढळून आलेल्या बाबींची माहिती घेऊन अहवाल ते संबंधित विभागांना देणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने अनेक त्रुटी
या महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने अनेक त्रुटी आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग व ठेकेदाराला वारंवार लेखी कळवले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक, महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व्हे करून लेखी दिले आहे. आता पुन्हा कोंडाईबारीपर्यंत सर्व्हे करून संबंधित विभागांना अहवाल देणार आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत भामरे, महामार्ग सुरक्षाविभाग, धुळे