गरजूंना वेळोवेळी केली जाते मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:08+5:302021-05-05T04:59:08+5:30

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन, उपाध्यक्ष रामचंद्र येशी, सचिव, हेमलता येशी, खजिनदार कुलदीप राजपूत, विश्वस्त स्वप्निल धाकड, ...

Help is given to those in need from time to time | गरजूंना वेळोवेळी केली जाते मदत

गरजूंना वेळोवेळी केली जाते मदत

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन, उपाध्यक्ष रामचंद्र येशी, सचिव, हेमलता येशी, खजिनदार कुलदीप राजपूत, विश्वस्त स्वप्निल धाकड, संजय गोपाळ, चंद्रकांत बाविस्कर गेल्या ३ वर्षांपासून बाराही महिने संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार, गोरगरीब व गरजू लोकांच्या सेवेसाठी निरंतर सेवाभावी कार्य करीत आहेत़ त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल अनेक दानशूर व्यक्तिमत्त्व सेवाभावी कार्यासाठी आर्थिक स्वरूपात व वस्तू रूपातदेखील सहकार्य करत असतात़ त्याच प्रकारे कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीतदेखील संस्था कार्यरत आहे़

या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरुवातीला सुमारे ३ हजार लोकांना मोफत मास्कचे वाटप केले़ त्यानंतर दररोज १०० गरजू लोकांना मोफत नाश्ता, पाणी, चहा, बिस्कीट वाटप केले़ लॉकडाऊनमुळे इतर राज्यांमधील शिरपूर येथे अडकलेल्या परप्रांतीय लोकांनादेखील जेवण व पाणी दिले़ शहरात विविध ठिकाणी तसेच तालुक्यातील मुखेड येथे ग्रामस्थांना जेवण वाटप केले़ लॉकडाऊनमुळे पायी जाणाऱ्या लोकांना शिरपूर टोलनाका, शिरपूर फाटा, दहिवाद व हाडाखेड येथे जेवण दिले़ तसेच मुक्कामी थांबलेल्या ६१ लोकांना मास्क, जेवण, पाणी, केळीचे वाटप केले़ त्यानंतर दररोज ३०० लोकांना मोफत जेवणाचे डबे पुरविले गेलेत़ तसेच पायी जाणाऱ्या कुटुंबांना भाजीपालादेखील देण्यात आला़

राजस्थान कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेस शिरपूर टोलनाक्यावर आल्यानंतर बसमधील चालक, वाहक व सर्व विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ, पाणी, चहा, बिस्कीटचे वाटप करण्यात आले़

गेल्या मे महिन्यात कडक लॉकडाऊन असल्याने मायदेशी पायपीट करून जाणाऱ्या सर्वच परप्रांतीय, मजूर व कामगार लोकांना शिरपूर ते पळासनेरपर्यंत दररोज ३०० लोकांना जेवणाचा डबे पुरविले. शहरातील व शनिमंदिर परिसरातील १०० गरजू कुटुंबांना भाजी मार्केट संघटनेच्या सहकार्याने रोज १०० गरजू कुटुंबांना मोफत पत्तागोबी, टोमॅटो, गवार, गिलके, भेंडी, मिरची असा हिरवा भाजीपालादेखील वाटप करण्यात आला आहे़ शिंगावे शिवारातील अत्यंत दयनीय परिस्थितीमधील १० गरजू कुटुंबांना मोफत धान्य सामग्रीचे वाटप करण्यात आले़ सोलर सिटीजवळ लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ४६ मजूरवर्ग व रामसिंग नगर येथे अडकलेले आंध्र प्रदेशातील २५ कुटुंबाला मोफत धान्य सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे़ शहरात भिक्षा मागून आपले जीवनाचा उघड्यावर उदरनिर्वाह करणारे ३२ गरजू मुलांना व ५ निराधार महिलांना नवीन कपड्यांचे व जेवणाचे वाटप करण्यात आले आहे़ कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील रेशन कार्डपासून वंचित असलेले अत्यंत गरजू कुटुंबांना मोफत रेशन कार्ड बनून दिलेत़

शहरातील फार्मसी कॉलेजच्या जवळ असलेल्या मेडिकलवर कोरोना व्हायरस नावाच्या आजारापासून डॉक्टर लोकांच्या सल्ल्याने जीव वाचविण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या तालुक्यातील लोकांसाठी मोफत पाणपोई सुरू करण्यात आली़ कोरोनाबाधित रुग्णांना लागणारे प्राणवायू म्हणजेच १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देऊन रुग्णांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्नदेखील करत आहोत़

कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये संस्थापक विकास सेन यांनी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने घेतली असून विकास सेन यांना प्राथमिक स्वरूपात डिजिटल प्रमाणपत्र देऊन पूर्णपणे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कलाम यांचे नातू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानित करण्याचे आश्वासन राज्याच्या समन्वयिका मनीषा चौधरी यांनी दिले आहे़

Web Title: Help is given to those in need from time to time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.