अवजड वाहनांमुळे शेती रस्ते झाले खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST2021-09-16T04:45:04+5:302021-09-16T04:45:04+5:30
आता शेतशिवारातून शेती उत्पादन घरादारात आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागेल. यासाठी अवैध वाळू वाहतुकीचा बंदोबस्त होणे गरजेचे झाले ...

अवजड वाहनांमुळे शेती रस्ते झाले खराब
आता शेतशिवारातून शेती उत्पादन घरादारात आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागेल. यासाठी अवैध वाळू वाहतुकीचा बंदोबस्त होणे गरजेचे झाले आहे. मालपूर येथील अमरावती नदी पात्र, प्रकल्पाजवळील परसोळे लवन, नाले आदी ठिकाणावरून सध्या अवैध वाळू उपसा सुरूच असून हे ठिकाणे अवैध वाळूचा अड्डा बनली आहेत. येथे दररोज पहाटे चार ते सकाळी आठ व सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत ट्रॅक्टरद्वारा वाळू उपसा होताना दिसून येतो. येथील शेतकऱ्यांच्या विरोधाला हे जुमानत नसून यामुळे विहिरीचे पाणी कमी होत या शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. परिणामी रब्बी हंगाम धोक्यात येईल . यामुळे अनेक वेळा येथील तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र काही उपयोग होत नसल्यामुळे हे शेतकरी हतबल झाले, तर यामुळे वाळू माफिया फोफावले असून महसूल विभागाने पुन्हा दंडात्मक कारवाई करून जरब बसवावा, अशी या मार्गावरील शेतकऱ्यांची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन मोठा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण रात्री पहाटे शेतात जाणे या रस्त्यावरून म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे आहे. या अवैध वाळू वाहतुकीमुळे या नाल्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडक लागेपर्यंत वाळू उपसा झाल्यामुळे आतापासून विहिरीच्या पाण्याच्या पातळीवर परिणाम झाला आहे, तर रात्री शेतशिवारात जाण्यासाठी रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. यासंबंधी अनेकांची तक्रार असून, कार्यवाहीची मागणी केली आहे. हा वाळू उपसा थांबत नसेल तर तो कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. याचा वरिष्ठांनी शोध घ्यावा व कारवाईचा बडगा उगारावा.
150921\20210913_111259.jpg
मालपूर येथील अवैध वाळु वाहतुक दारांनी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची अशी केली दुर्दशा