थाळनेरसह मालपूर परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:43 IST2019-07-25T12:42:47+5:302019-07-25T12:43:09+5:30
वरुणराजाचे पुनरार्गमन : वैंदाणे, इंदवे, हट्टी, कर्ला, परसोळे येथेही हजेरी, शेतात साचले तळ

बुधवारी झालेल्या पावसामुळे मालपूर- कर्ला रस्त्यावरील नाला तुडूंब भरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर/थाळनेर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात व शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे २४ रोजी दुपारी जोरदार पाऊस झाला.
मालपूरसह परिसरात मुसळधार
मालपूरसह परिसरातील वैंदाणे, इंदवे, हट्टी, कर्ला, परसोळे येथे बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. अगोदरच्या पावसामुळे शेतजमीन ओली असताना पुन्हा हा पाऊस झाल्यामुळे शेतात तळे साचले.
तसेच पाणी फाऊंडेशनअंतर्गत मालपूर- कर्ला रस्त्यावरील नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. या पावसामुळे नाल्यात पुन्हा पाणी आल्याने नाला तुडूंब भरला आहे. यामुळे विहिरीचा जलस्तर लवकर वाढेल, अशी अपेक्षा आहे.
मालपूर येथे शनिवार १४८ मि.मी. तर त्या आधी २ मि.मी. व २४ रोजी पुन्हा १ मि.मी. पावसाची नोंद झाली. असा एकूण १५१ मि.मी. पाऊस आतापर्यंत झाला आहे.
थाळनेर येथे जोरदार
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे बुधवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरात पाणी साचले होते. या पावसामुळे जलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. तसेच विहिरींची पाण्याची पातळीही वाढणार आहे.