सकस आहार, आराम आणि उपचार महत्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:01 IST2020-06-21T11:59:59+5:302020-06-21T12:01:55+5:30
कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करा - बालरोगतज्ञ डॉ़ अभिनय दरवडे

dhule
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पावसाळ्यात लहान मुलांना साथीचे आजार व विषाणूंचा संसर्ग पटकन होतो. एक ते पाच वर्ष मुलांचा वाढीच्या काळात मुलांना एका वर्षात १२ विषाणूजन्य आजार होतात. एका विषाणूजन्य आजारातून बरे होत असतानाच मुलांना दुसऱ्या विषाणूचा संसर्ग होतो. जसजशी मुलांचे वाढ होते तसे या संसगाचे प्रमाणही कमी होते. विषाणू हे संसर्गजन्य असतात आणि संपर्क आल्यास ते सहज पसरतात.त्यामुळे सकस आहार, पुरेसा आराम आणि व्यायाम करणे हा त्यासाठी योग्य उपाय आहे. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सहसचिव तथा बालरोगतज्ञ डॉ़ अभिनय दरवडे यांनी ‘लोकमत ’शी बोलतांना दिली़
प्रश्न - लहान मुलांना पावसाळ्यात होणारे साथीचे आजार कोणते?
उत्तर - लहान मुलांवर पावसाळ्यात किंवा अन्य वेळी विषाणु किंवा सूक्ष्मजंंतुचा अधिक प्रभाव होतो़ विषाणूंची बेसुमार वाढ झाल्यास शरीराच्या कुठल्याही भागात संसर्ग होऊ शकतो़ त्यामुळे सर्वसामान्यपणे फ्लू, सर्दी तसेच घशाचा संसर्ग, जुलाब आणि उलट्या इत्यादी आजार होतात़ याच विषाणूमुळे कांजण्या, इबोलाचा संसर्ग सुद्धा होऊ शकतो़
प्रश्न - मुलांमध्ये विषाणूंचा संसर्ग किती वेळ राहू शकतो ?
उत्तर- पावसाळ्यात साथीचे आजार लहान मुलांना लगेच होतात़ त्यामुळे मुलांना बरे जरी वाटत असले, तरी काही दिवसानंतर पुन्हा त्रास जाणवू लागतो़ लहान मुलामध्ये विषाणूंचा संसर्ग दोन आठवड्यापर्यंत राहतो़ विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसत नाहीत़ या काळात खोकला व रॅशेस होतात आणि काही दिवसातच ते नाहीसे देखील होतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जावू नये़
प्रश्न - विषाणूंचा संसर्ग झाल्यास काय परिणाम होतो ?
उत्तर- जर मुलाला खोकला झाला तर तो दोन आठवडे राहु शकतो़ मुलांना बालदमा असेल तर विषाणूंच्या संसगामुळे दमा वाढू शकतो़ काही वेळा, मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि घरघर होऊ शकतो़ काहीवेळा मुलांना अंगावर पुरळ होतात आणि त्यामुळे खाज सुटते, संसर्ग झालेल्या मुलास भूक लागत नाही अशक्त पणा जाणवतो, हातपाय दुखतात. मात्र काळजी करण्याचे कारण नाही अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या़
घाबरू नका सामना करावा
कोरोनाच्या निमित्ताने सध्या धास्तावलेले पालक डॉक्टरांकडे गर्दी करतांना दिसत आहेत़ जगभरात या विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलेले असतांना त्याच्या बद्दल अर्धवट किंवा चुकीची माहिती कानावर पडल्यामुळे सामान्य जनता घाबरलेली आहे़ मुळात कोरोना आणि त्यासारखे सर्वच विषाणू आणि यामुळे होणाºया आजाराबद्दल यानिमित्ताने मोकळी चर्चा होणं खूप महत्वाचे आहे़
सार्वजनिक ठिकाणी अधिक धोका
विषाणूंचा संसर्ग लगेच होतो. हा संसर्ग शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झालेल्या मुलाच्या सानिध्यात आल्यावर होतो. शिंका, खोकला किंवा अस्वच्छ हात किंवा गळणारे नाक ह्यामार्फत संसर्ग होतो. शौचातून, उलटीतून किंवा कीटकांनी चावल्यावर सुद्धा विषाणू पसरतात. अस्वच्छ पाणी आणि अन्नपदार्थांमार्फत विषाणूंचा संसर्ग पसरू शकतो. हवामानात जेव्हा बदल होतात तेव्हा विषाणूंचा संसर्ग पसरतो़