बसचालकांची होणार आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:13 IST2020-05-28T22:12:49+5:302020-05-28T22:13:11+5:30
जिल्हाधिकारी : राजस्थानमधून विद्यार्थ्यांना आणले, स्थलांतरीत कामगारांना सिमेवर सोडले

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातर्फे स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडणारे, तसेच कोटा (राजस्थान) येथून विद्यार्थ्यांना आणणाऱ्या बस चालकांची त्यांच्या सुरक्षितेसाठी तत्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी हे कोटा येथे अडकले होते. त्यांना आणण्यासाठी धुळे विभागातून ७२ बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे एक हजार २४ विद्यार्थी आपापल्या घरी सुखरुप पोहोचले. तसेच ९ ते २५ मे या कालावधीत धुळे जिल्ह्यातून पायी जाणाºया श्रमिकांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या सीमेवर बसद्वारे सोडण्यात आले. एकूण ४८८ बसद्वारे १० हजार ८३८ मजुरांना यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आले. यादरम्यान, धुळे जिल्ह्यातील दोन बस चालकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बस चालकांच्या आरोग्य तपासणीचे आदेश दिले आहेत़ या चालकांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या चालकांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ तपासणी करुन घ्यावी. त्यातून कोणी कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळून आला तर त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल़
आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन त्यात परिपूर्ण माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
आरोग्य सेतू अॅप हे गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. हे अॅप पूर्णपणे शासकीय असून विनामूल्य उपलब्ध आहे. या अॅपमध्ये स्वयं चाचणीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये आपल्या आरोग्याविषयीचा तपशील मागितला जातो. या माहितीच्या आधारे तुमच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे असू शकतात का? याविषयी हे अॅप माहिती देते. या अॅपची निर्मिती वैविध्यपूर्ण रितीने करण्यात आली आहे. एखादा अॅप यूजर आपल्या जवळच्या भागात असेल आणि त्याची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल किंवा त्याच्यात कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली, तर त्याची माहिती आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे आपण वेळीच सतर्क होवून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळू शकतो. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे़ शहरासह जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने हे आवाहन केले आहे़