सीईओंकडून आरोग्य केंद्राची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:20 IST2019-12-18T23:20:30+5:302019-12-18T23:20:56+5:30
शिरपूर : वाघाडी, वकवाड ग्रामपंचायतीला अचानक दिली भेट

Dhule
शिरपूर :जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी आज तालुक्यातील वाघाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन दोन ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतल्याचे समजते़ मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.
मंगळवारी येथील पंचायत समितीच्या आमदार अमरिशभाई पटेल सभागृहात जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी मधुकर वाघ यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांची आढावा बैठक बोलवली होती़ सुरूवातीला आयएसओ ग्राम पंचायतींचे प्रशिक्षण सुमारे अडीच तास सुरू होते. त्यानंतर ग्रामसेवकांचा आढावा घेण्यात आला़ त्यावेळी ग्रामसेवकांनी संबंधित अधिकारी सहकार्य करीत नाही़ ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल केले जातात़ आयुक्त्यांनी या संदर्भात साधे पत्र सुध्दा दिले नाही़ मात्र शासन निर्णयानुसार तसे पत्र दिले जात नसल्याचे सांगण्यात आले़ गेल्या बैठकीत देखील याविषयावर चर्चा झाली होती, मात्र तो विषय बिडीओस्तरावर मिटविण्यात आल्याचे बीडीओ वाय़ डी़ शिंदे यांनी ग्रामसेवकांना सांगितले़ त्यावर शिंदे देखील सहकार्य करीत नसल्याचा आरोप ग्रामसेवकांनी केला़ कोणतेच अधिकारी सहकार्य करीत नसल्याचे सांगून ग्रामसेवक निघून गेले होते़ याबाबत डेप्युटी सीईओ वाघ यांनी घडलेली घटना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी सांगितली़ १८ रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी वाघाडी ग्रामपंचायतीला भेट देवून दप्तर तपासणी केली़ कोणकोणती कामे केलीत, एम़बी़, ६५ नमुना, कामाचे इस्टीमेट, कोणत्या कामाची नोंद रजिष्ठरला केली आहे का की बनावट कामे दाखविली आहेत त्याची चौकशी करायला सांगितली़ विस्तार अधिकारी मोरे यांनी सर्व दप्तरची तपासणी करून बीडीओ शिंदे यांच्याकडे टिपणी सादर केली़ वकवाड आरोग्य केंद्राला भेट दिली़ तेथील अंगणवाडी कार्यकर्तींना अमृत आहार दिला जातो का, बालमृत्यु कसे झालेत, कुपोषित मृत्यु कसे झालेत, सध्या आरोग्य केंद्राची काय परिस्थिती आहे ही माहिती जाणून घेतली़ यावेळी गटविकास अधिकारी वाय़ डी़ शिंदे, डॉ़ प्रसन्न कुलकर्णी, सचिन शिंदे, मोरे, पावरा आदी उपस्थित होते़