पिंजारझाडीचा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 22:50 IST2021-02-17T22:48:48+5:302021-02-17T22:50:01+5:30
प्रस्तावावर सह्या करण्याचा मोबदल्यात ३ हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

पिंजारझाडीचा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
धुळे : सेवानिवृत्तीनंतरचा पेन्शन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय येथे सादर करण्यासाठी प्रस्तावावर सह्या करण्याचा मोबदल्यात ३ हजार रुपये लाच स्वीकारताना साक्री तालुक्यातील पिंजारझाडीचा मुख्याध्यापक गुलाब नथ्थू पिंजारी (५५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.
साक्री तालुक्यातील पिंजारझाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथून तक्रारदार लवकरच सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचा पेन्शन प्रस्ताव धुळ्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात येणार होता. या प्रस्तावावर सह्या करण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक गुलाब नथ्थू पिंजारी यांनी ८ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. प्रकरणाची शहानिशा व चौकशी करण्यात आली. मुख्याध्यापक पिंजारी यांनी तडजोडीअंती ३ हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम देण्याचे ठरल्यानंतर सापळा लावण्यात आला. यात मुख्याध्यापक गुलाब नथ्थू पिंजारी हा ३ हजार रुपये घेताना रंगेहाथ सापडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण व पथकातील जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, राजन कदम, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, भूषण शेटे, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली.