एसटीने प्रवास करताय सॅनिटायझर घेतलाय ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:39+5:302021-06-04T04:27:39+5:30
धुळे - मागील दीड महिन्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा धावू लागली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही मिळू लागला आहे. मात्र, अनेक ...

एसटीने प्रवास करताय सॅनिटायझर घेतलाय ना ?
धुळे - मागील दीड महिन्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा धावू लागली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही मिळू लागला आहे. मात्र, अनेक प्रवासी जणू कोरोना संपलाय, अशा आविर्भावात प्रवास करताना आढळत आहेत. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सॅनिटायझर व मास्क या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
धुळे आगारातील १३१ बसपैकी १२ बस सुरू करण्यात आल्या आहेत. एका बसमध्ये २२ जणांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने आणखी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागील दीड महिन्यापासून एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. या काळात मात्र महामंडळाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता बसेस सुरू झाल्या असल्या तरी मोजक्याच फेऱ्या होत आहेत. आगारातून बस बाहेर पडते त्यावेळी ती सॅनिटाइझ केली जात आहे, तसेच २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी असल्याने सामाजिक अंतर राखले जात आहे. वेळोवेळी बस सॅनिटाइझ केली जात आहे. मात्र, तरीही प्रवाशांनी सॅनिटायझर जवळ बाळगणे व त्याचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव घालता येऊ शकतो. मात्र, प्रवास करत असताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले तर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढून बस फेऱ्या बंद करण्याची वेळ येऊ शकते. आगाराकडूनही वेळोवेळी सॅनिटायझेशन केले जात आहे, तसेच प्रवाशांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
सर्वाधिक वाहतूक नाशिक मार्गावर -
१- मागील दीड महिन्यापासून एसटीची चाके थांबली होती. आता काही बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक बस आजही आगारातच थांबलेल्या आहेत.
२- सध्या धुळे आगाराच्या १२ बस सुरू झाल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक बस फेऱ्या या नाशिक मार्गावर धावत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
३- २२ प्रवाशांना बसण्याची परवानगी मिळाली आहे. एका बसमधून १४ ते १५ प्रवासी प्रवास करत आहेत.
बस होते वेळोवेळी सॅनिटाइझ -
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे काही बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. आगारातून बस बाहेर पडते त्यावेळी सॅनिटाइझ करण्यात येत आहे, तसेच बस परत आल्यानंतरही सॅनिटाइझ करत असल्याची माहिती मिळाली.
दीड महिन्यात ९ कोटींचा तोटा -
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी महामंडळ मोठ्या अडचणीत सापडले आहे. मागील दीड महिने बस फेऱ्या बंद असल्यामुळे धुळे आगाराचे तब्बल ८ ते ९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रवासी घरातच -
काही बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे यासाठी २२ प्रवाशांना एका बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एका बसमधून १४ ते १५ प्रवासी प्रवास करीत आहेत.
बस सुरू झाली अन् जिवात जीव आला
मागील वर्षभरापासून अनेकवेळा बस सेवा बंद करावी लागली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने मागील दीड महिन्यापासून एसटी एकाच जागी उभी होती. मात्र, आता पुन्हा बस सेवा सुरू झाल्याने आनंद झाला. बस वेळोवेळी सॅनिटाइझ केली जात आहे, तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आहे.
- चालक, धुळे आगार.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद झालेली बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. बसमध्ये मोजक्या प्रवाशांना परवानगी असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती नाही. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आहे. मोजक्या फेऱ्या सुरू झाल्याने अजूनही अनेक सहकारी घरीच आहेत. पूर्ण फेऱ्या सुरू झाल्या तर ते देखील ड्युटीवर येतील. त्यामुळे पूर्ण फेऱ्या सुरू व्हायला हव्यात.
- वाहक, शिरपूर आगार.