Hajj pilgrims honor friends | हजयात्रेकरुंचा मित्रांनी केला सन्मान
हजयात्रेकरुंचा मित्रांनी केला सन्मान

बभळाज : चांगल्या कामाची कधीतरी दखल घेतली याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील़ या उदाहरणांमध्ये काही कामं आकस्मिकपणे घडतात़ तर काही कामं नाईलाजाने करावी लागतात़ तर काही कामं हेतुत: पण सहज घडत असतात़ असंच एक उत्तम उदाहरण रमजान गंभीर खाटीक (रा़ चांदसर ता़ धरणगाव जि़ जळगाव) या युवकाच्या बाबतीत देता येईल़
नावात त्याचा धर्म सामावलेला आहे़ धर्माने मुस्लिम असणाऱ्या युवकाचे संबंध मित्रांचा गोतावळा सर्व धर्मीयच म्हणावा लागेल, असा आहे़ मुळ चांदसर येथे राहणारा, पण व्यवसायानिमित्त पुण्याला वास्तव्यास असणारा रमजान पुण्यातही मुळ स्वभाव घेऊन वावरतो, हे विशेष़ त्याने पुण्यात ‘आम्ही चांदसरकर पुणेरी’ या नावाने आगळं वेगळं संघटन उभारलंय आणि त्या माध्यमाने विविध सामाजिक उपक्रम आणि धर्मकार्य केली जातात़ यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे रमजानच्या नेतृत्वात आषाढी वारीतल्या वारकऱ्यांना पुण्यात पाणी बॉटल, सरबत, जेवण किंवा नास्ता दरवर्षी दिला जातो़ हा प्रघात गेली १० वर्षे सुरु आहे़ त्यासाठी रमजान हजारो रुपयांची पदरमोड करीत असतो़ पुणेरी चांदसरकरांचं वर्षातून एकदा स्रेहमिलन, गुणी पाल्यांचा गौरव आणि गरजवंतांना योग्य मदत असे कार्य होत असतात़ सत्कार कार्यक्रमातून दोन धर्मातील मित्रांची जवळीकता महत्वपूर्ण आहे़ इतरांसाठी ते आदर्शवत वस्तुपाठ आहे़
रमजानच्या या कार्याची माहिती गावांपर्यंत पोहचायला आजच्या आधुनिक जगात कितीसा वेळ लागतो? रमजानने केलेल्या कार्याची दखल घेतली पाहीजे, असा विचार सुरु असताना रमजानची पत्नी मुमताज हज यात्रेला जाणार असल्याचे चांदसर स्थित मित्रांना कळलं़ त्यांनी मुमताज यांच्यासह हजयात्रेकरुंच्या निरोपा दाखल सत्काराचे आयोजन केले़ यात प्रामुख्याने विकास पवार, संजय मुरलीधर पवार, सरपंच सचिन पवार, गजानन पाटील, प्रदीप बाविस्कर, शैलेंद्र वाघ, गोरक्षनाथ कोळी यांच्यासह अन्य मित्रांनी सहभाग घेतला़ कार्यक्रमावेळी धरणगावचे आमदार गुलाबराव पाटील, अब्दुल गफार मलिक, अखलाज करीम सालार, प्रतिभा शिंदे, डी़ जी़ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ हा कार्यक्रम माजी आमदार मुरलीधर पवार यांच्या फार्म हाऊसवर रंगलेला हा दिमाखदार सोहळा भेदाभेदाचे रंग पुसत गेला़

Web Title: Hajj pilgrims honor friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.