भल्या पहाटे तीन वाहनांतून पकडला सव्वा कोटीचा गुटखा; सात जण ताब्यात
By देवेंद्र पाठक | Updated: March 21, 2023 18:21 IST2023-03-21T17:31:09+5:302023-03-21T18:21:44+5:30
निमडाळे शिवारात उपअधीक्षकांची कारवाई

भल्या पहाटे तीन वाहनांतून पकडला सव्वा कोटीचा गुटखा; सात जण ताब्यात
धुळे : हिंदू नववर्षाच्या आदल्या दिवशी पोलिस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडून कारवाईची गुढी उभारली. दोन ट्रक आणि एक कार अशा तीन वाहनांतून १ कोटी १२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी वाहन चालक आणि सहचालक अशा ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई धुळे तालुक्यातील निमडाळे शिवारात मंगळवारी पहाटे करण्यात आली.
धुळे तालुक्यातील निमडाळे गावाच्या शिवारात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा दोन ट्रकमधून येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या पथकाला मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारावर रेड्डी आणि त्यांच्या पथकाने रात्री १० वाजेपासून सापळा लावला होता. पहाटेच्या सुमारास एमएच ०४ एफजे ३०४८, एमएच ०४ एचडी ७३५० या दोन ट्रकांच्या पुढे पायलटिंग करणारी एमएच १९ सीएल ९९४४ क्रमांकाची कार जात असताना पोलिसांनी थांबविली. वाहनचालकाकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.
वाहने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात ५० मोठे आणि ५० लहान कार्टून आणि १७८ पोते आढळून आले. त्याची मोजणी केल्यानंतर हा सर्व जप्त केलेला मुद्देमाल १ कोटी १२ लाख रुपयांचा आहे. सात संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेला मुद्देमाल हा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पंचनामा करुन घेण्याचे काम सुरू आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय ऊजे, कर्मचारी कबिर शेख, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, मंगा शेमले, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, कर्नल चौरे, शरद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.