गुरू तत्व आहे़़़ विचार आहे़़़ व्यक्ती नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 13:12 IST2020-07-05T13:11:26+5:302020-07-05T13:12:11+5:30
जिल्हाधिकारी । जगाचे व्यापक हीत पहाणारी प्रत्येक व्यक्ति मला गुरूतुल्य आहे

dhule
सुनील बैसाणे ।
धुळे : गुरू त्व आहे, व्यक्ति नाही़ जगाचे व्यापक हीत पहाणारी प्रत्येक व्यक्ती मला गुरूतुल्य आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी गुरूपौर्णिमेचे महत्व विषद केले़
कोणत्याही क्षेत्रात काम करताना व्यापक सामाजिक हीताला प्राधान्य देवून त्या दृष्टीने प्रामाणिकपणे काम करीत समाजाला दिशा देणारी कोणतीही व्यक्ती गुरू असु शकते़ एखाद्या मोठ्या व्यक्तीलाच गुरू मानले पाहिजे असे नाही़ स्वार्थाचा त्याग करुन जनहितासाठी झटणाऱ्या सर्वच व्यक्ती गुरू आहेत़ देश आणि समाजाच्या कल्याणाचा विचार पेरुन तो विचार कृतीत आणणारा एखादा शिपाई किंवा ड्रायव्हरसुध्दा माझ्यासाठी गुरूतुल्य आहे, असे विचार जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना मांडले़
गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. धुळे जिल्ह्यातही गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी होते़ या दिवसाचे महत्व असले तरी कोरोनाच्या संसर्गामुळे घरात राहून हा सण साजरा करावा़ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी आणि उपचार करुन घ्यावे, असे आवाहन त्यानी यानिमित्ताने केले आहे़
गुरू ठायी ठायी आहे़ चांगली शिकवण देणारा प्रत्येक व्यक्ती गुरू आहे़ अशा परोपकारी व्यक्तींच्या विचारांना आणि तत्वांना वंदन करतो़, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या़
१उन्हाळा संपल्यानंतर येणाºया आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा असते़
२गुरू हा शब्द संस्कृत भाषेत ‘अंधकार दूर करणारा’ या अर्थाने वापरला जातो़
३गुरू समाजाचे अज्ञान दूर करतो़ निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो़
४गुरूपौर्णिमेच्या दिवशी पारंपारिकरित्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते़
५योग आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी हा दिवस विशेष फायदेशिर मानला जातो़
भारतात पूराण काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे़ पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत़ ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखस्तु जीवनाचा त्याग करावा लागत असे़ ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरू पौर्णिमा साजरी केली जात असे़ आता गुरूकुल परंपरा राहिलेली नाही़ गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे़ गुरू या शब्दाला आता व्यापकता आली आहे़ चांगला विचार देणारी कोणतीही व्यक्ती गुरू असते़