किराणा दुकान फोडून तेलासह रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:14 IST2021-03-25T21:13:25+5:302021-03-25T21:14:26+5:30

वाडीभोकर रोड पाठोपाठ साक्री रोडवरील घटना, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

The grocery store was burglarized and cash was confiscated with oil | किराणा दुकान फोडून तेलासह रोकड लांबविली

किराणा दुकान फोडून तेलासह रोकड लांबविली

धुळे : टाळेबंदी काळात भरभक्कम पगार असलेल्या शासकीय नोकरांकडे घरफोडीचे प्रमाण वाढले होते. परंतु आता चोरट्याने मेडीकल दुकान, किराणा दुकानांकडे आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. वाडीभोकर रोडवरील घटनेपाठोपाठ लागलीच साक्री रोडवरील किराणा दुकान फोडून चोरट्याने तेल, पावडरसह काही प्रमाणात गल्यातील रोकड असा हजारो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.
जिल्ह्यात टाळेबंदी काळात पोलीस, महसूल, शिक्षक अशा शासकीय सेवेत असणाऱ्यांकडे चोरट्याने हातसफाई केली. दागिन्यांसह महागडे कपडे, ब्रॅण्डेड वस्तू, लाखोंची रोकड चोरीला गेल्याचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे. परंतु काही दिवसांपासून चोरट्यांनी आपला मोर्चा हा सर्वसामान्य नागरीकांकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी चाळीसगाव रोड भागात एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या एका लोहाराकडे मुलीच्या लग्नासाठी जमविलेले पैसे चोरीला गेले होते. तर वाडीभोकर रोडवरील विनायक नगरजवळील एका मेडीकल दुकानातून औषधांसह रोकड लांबविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर गणेश नावाच्या किराणा दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
दुकानाचे मालक कैलास अग्रवाल सकाळी दुकानावर आले असताना त्यांना दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसून आले. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी गुरुवारी पहाटे गॅस कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करीत ३ ते ४ तेलाचे खोके, पावडरचे डबे, डोक्याला लावायच्या तेलाच्या बाटल्या, गल्यात असलेली ३ ते ४ हजाराची रोकडसह अन्य किराणाचा सामान लंपास केला. दुकानात चोरी झाल्याची घटना त्यांनी पोलिसांना कळविली. माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ श्वान पथक आणि ठसे तज्ञाच्या पथकाने देखील धाव घेतली. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने सायंकाळी उशिरा चोरीचा गुन्हा दाखल झाला.

Web Title: The grocery store was burglarized and cash was confiscated with oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.