ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर, सर्वच पक्षांनी केला विजयाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:15+5:302021-01-19T04:37:15+5:30
धुळे तालुक्यातील ६६ पैकी ६१ ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थक पॅनलचा विजय झाल्याचा दावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केला ...

ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर, सर्वच पक्षांनी केला विजयाचा दावा
धुळे तालुक्यातील ६६ पैकी ६१ ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थक पॅनलचा विजय झाल्याचा दावा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केला आहे. तर या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामकृष्ण खलाणे यांचा कापडणे गावात तर भाजपचे पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील यांच्या पॅनलचा उडाणे गावात पराभव झाला आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे यांच्या पॅनलचा बोरीस गावात पराभव झालेला आहे.
साक्री तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मात्र बहुतांश गावांत स्थानिक पॅनलांनी सत्ता मिळविली. मात्र साक्री तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री डाॅ. सुभाष भामरे यांचे बंधू भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांनी ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवीत पुन्हा सत्ता काबीज केली, तर दुसरीकडे सत्ताधारी शशिकांत भामरे यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला.
शिंदखेडा तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. आजच्या निकालात ३५ ग्रामपंचायतींवर भाजपने तर १३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजय मिळविल्याचा दावा करण्यात आलेला आहे. शिरपूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळविला आहे. तसेच नऊ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा राष्ट्रवादीने दावा केला आहे.